मुरलीधर कुलकर्णी / कोल्हापूर इथल्या खवय्यांची प्रथम पसंती असलेली खाऊ गल्लीत मिळणारी राजाभाऊंची भेळ कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीचा जणू अविभाज्य भाग बनली आहे. ५ डिसेंबर १९६५ रोजी स्वर्गीय राजाभाऊंनी सुरू केलेली ही भेळ आज अर्धशतकाची झाली आहे. साधारण १९६0-६२च्या सुमारास सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील ढवळी या छोट्याशा खेड्यातून राजाभाऊ शिंदे नावाचा पंचवीसीतला एक तरुण कामाच्या शोधात कोल्हापुरात आला. पोटापाण्यासाठी काय करावे या विवंचनेत असलेल्या त्या तरुणाने सुरुवातीचे काही दिवस अनेक छोटी, मोठी कामे केली; पण कशातच जम बसेना. शेवटी एक दिवस त्याच्या डोक्यात एक कल्पना आली अन् लगेच तो कामाला लागला. सायकलवरून फिरून कोल्हापूरच्या गल्लीबोळांतून भडंग विकण्याचा व्यवसाय त्यानं सुरू केला. या भडंगाच्या चवीचंलोकांना जणू वेडच लागलं. लोक त्याच्या येण्याची वाट पाहू लागले. थोडं अर्थार्जन झाल्यावर त्यानं भवानी मंडपाच्या कमानीजवळ एका छोट्याशा हातगाडीवर आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. भडंगाबरोबरच कांदा, कोथिंबीर, गोड चिंचेचं पाणी, शेव आणि चिवडा घातलेला भेळ नावाचा एक नवाच पदार्थ त्यानं कोल्हापूरकरांपुढं सादर केला अन् बघता-बघता कोल्हापूरकरांना त्याच्या या भेळेनं अक्षरश: वेड लावलं. या पदार्थाची लोकप्रियता पाहून शहरात पुढे अनेकांनी भेळेच्या गाड्या सुरू केल्या; पण मोठ्या मनाच्या राजाभाऊंनी कधीच कुणाला अटकाव केला नाही. आज त्यांची ही ‘आॅल इंडिया स्पेशल भेळ’ पन्नास वर्षांची यशस्वी वाटचाल संपवून ५१व्या वर्षांत पदार्पण करतेय. त्यांची दोन मुले रवींद्र आणि अरविंद आज व्यवसाय सांभाळत आहेत. पन्नास वर्षांपूर्वी तुटपुंज्या भांडवलावर सुरू केलेल्या त्यांच्या व्यवसायात आज लाखोंची उलाढाल होतेय; पण हे सगळं पाहायला आज राजाभाऊ मात्र आपल्यात नाहीत, याचंच त्यांच्या परिवारासह कोल्हापूरच्या खवय्यांनाही दु:ख होतंय.
राजाभाऊंच्या भेळने गाठली पन्नाशी...
By admin | Published: December 06, 2015 1:10 AM