विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मराठीतील कसदार लेखक डॉ. राजन गवस यांचा मुलगा व मुलगीच्या नावे व्हॉटस्अॅपवरून मेसेज पाठवून फसवणूक केली जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याबद्दल गवस यांनी भुदरगड पोलिसांत संबंधित तरुणांवर कारवाई करण्यासाठी २४ जूनला लेखी तक्रार केली आहे; परंतु पोलिसांकडून आजअखेर कोणतीच कारवाई झालेली नाही. अशा प्रकारे नोकरीचे आमिष व अन्य कारणे देऊन किमान १५ मुलींना फसविण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
डॉ. गवस यांचे नाव मराठी साहित्यविश्वाला चांगले परिचित आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाच्या अथवा मुलीच्या नावे मेसेज गेल्यावर लोकांतही संभ्रम निर्माण होत आहे. आपल्या नावांचा वापर करून कोणीतरी गोरगरीब मुलामुलींची फसवणूक करू नये, असे डॉ. गवस यांना वाटते. मोबाईल क्रमांक : ९३२२६१७५९९ या नंबरवरून कॉल व चॅटिंग केले जात आहे. ट्रू कॉलरवर हा नंबर संहिता राजन या नावाने नोंद असल्याचे दिसते. संहिता हे डॉ. गवस यांच्या मुलीचे नाव आहे. प्रत्यक्षात हा नंबर तिचा नाही. तो संग्राम यशवंत देसाई (रा. आंतुर्ली, ता. भुदरगड) यांचा असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. हे फोन देसाई करतात की अन्य कोण करते, याची चौकशी पोलिसांनी करण्याची गरज आहे. मुलाचे नाव सांगून मुलींना फोन केले जात आहेत. त्यांना लग्नाचे आमिष दाखविले जात आहे. एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखविण्यात आले. काही तरुणींना त्याने कोरे धनादेश दिले आहेत. ‘नोकरीची बोलणी करण्यासाठी पुण्यात या,’ असा फोन वर्धा येथील व्यक्तीस करण्यात आल्याची तक्रार डॉ. गवस यांच्यापर्यंत आली आहे. याच नंबरवरून दूरचित्रवाणीवरील काही अभिनेत्यांशीही संपर्क साधण्यात आला आहे. या फोनचा डॉ. गवस कुटुंबीयांना नाहक मानसिक त्रास होत आहे.
----
डॉ. गवस यांची तक्रार आमच्याकडे आली आहे; परंतु व्हॉटस्ॲपवरील चॅटिंग उपलब्ध होत नसल्याने कारवाईत अडचणी आहेत. तरीही संबंधित तरुणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना गडहिंग्लज पोलीस उपअधीक्षकांनी दिल्या आहेत; परंतु मी सुट्टीला गावी आलो असल्याने अजून कारवाई केलेली नाही.
- सतीश मयेकर
साहाय्यक पोलीस निरीक्षक, भुदरगड पोलीस ठाणे