राजाराम बंधाऱ्यावरील दोन वर्षांपूर्वी टाकण्यात आलेला सिमेंट कॉंक्रिटचा स्लॅब पाण्याच्या प्रवाहामुळे पुन्हा वाहून गेला. पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हा प्रकार आढळून आला. धोकादायक स्थितीतही बुधवारी दुपारपासूनच या बंधाऱ्यावरून वाहनधारकांची वाहतूक सुरू होती; मात्र ती पोलिसांनी बंद केली.
हा कॉंक्रीटचा स्लॅब वाहून गेल्यामुळे बंधाऱ्यावर मोठे खड्डे पडले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाटबंधारे विभाग व पोलिसांना याची माहिती लागताच बुधवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास बॅरेकेटस लावून राजाराम बंधारा दोन्ही बाजूंनी बंदिस्त करण्यात आला.
पाटबंधारे खात्याच्यावतीने गुरुवारी सकाळी उखडलेला भाग काढून टाकण्यात येणार आहे. आतापर्यंत तीन वेळा बंधाऱ्यावरील स्लॅब वाहून गेला आहे. दरम्यान पंचगंगेची पाणी पातळी कमी झाल्यामुळे बंधाऱ्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात दलदल व कचरा वाहून आला आहे. शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी या ठिकाणी येऊन पोलीस बंदोबस्त लावला. यावेळी पाटबंधारे विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.
फोटो : २३ राजाराम बंधारा
गेल्या १६ जूनपासून पावसाने लावलेल्या संततधार हजेरीमुळे यावर्षी प्रथमच पाण्याखाली गेलेला राजाराम बंधारा बुधवारी खुला झाला. मात्र बंधाऱ्यावरील स्लॅब वाहून गेल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे येथील वाहतूक पोलिसांनी बंद केली.
(छाया : दीपक जाधव)