राजाराम कारखाना निवडणूक: सतेज पाटील गटाला तिसरा धक्का, उमेदवार अपात्रतेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 12:19 PM2023-04-13T12:19:16+5:302023-04-13T12:20:46+5:30
निवडणूक निर्णय अधिकारी, प्रादेशिक साखर सहसंचालक व उच्च न्यायालय या तिन्ही ठिकाणी अपयश आल्याने विरोधी आघाडीला धक्का
कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलेल्या २९ जणांची याचिका बुधवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे विरोधी आघाडीला हा धक्का मानला जात आहे.
‘राजाराम’च्या निवडणुकीत कारखान्याच्या पोटनिवडणुकीचा भंग केला म्हणून विरोधी आघाडीच्या २९ जणांंचे ३० अर्ज व एक इतर अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे यांनी अपात्र ठरविले. याविरोधात प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्याकडे अपील केले होते, त्यावर सुनावणी होऊन सोमवारी त्यांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला. याविरोधात सोमवारी दुपारीच विरोधी आघाडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी सकाळी सुनावणी झाली.
सत्तारूढ व विरोधी आघाडीकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. कारखान्याचा पोटनियमानुसार करार केलेल्या क्षेत्रातील ऊस पुरवठा करणे निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकाला बंधनकारक असल्याचे सत्तारूढ आघाडीच्या वकिलांनी मुद्दा मांडला. यावर, न्यायालयाने विरोधी आघाडीची याचिका फेटाळून लावली. निवडणूक निर्णय अधिकारी, प्रादेशिक साखर सहसंचालक व उच्च न्यायालय या तिन्ही ठिकाणी अपयश आल्याने विरोधी आघाडीला हा धक्का मानला जात आहे.
दोन्ही पॅनलची घोषणा करण्यात आली असून आज, गुरुवारी चिन्हे वाटप करण्यात येणार आहे. २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे.