कसबा बावडा : राजाराम कारखान्याच्या कारभाराबाबत लोकांच्या मनामध्ये वेळेनुसार दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचे काम आमदार सतेज पाटील करत आहेत. नेहमीच दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी काहीतरी वेगळं करतोय असे सांगायची त्यांची पद्धत आहे. एकीकडे सहवीज प्रकल्पाबाबत काहींनी विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र प्रकल्प का पूर्ण झाला नाही, असा प्रश्न विचारायचा, अशी दुटप्पी भूमिका ते घेत आहेत, असा आरोप माजी आमदार अमल महाडिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, चेअरमन दिलीप पाटील उपस्थित होते. अमल महाडिक म्हणाले राजाराम कारखान्यावर नेहमी दर कमी दिल्याचा आरोप केला जातो; पण कारखान्याचा प्लांट जुना आहे. १२२ गावे आणि साडेसात तालुक्यांत कार्यक्षेत्र विस्तारले आहे. कार्यक्षेत्रातील काही गावे पूरबाधित आहेत. कारखान्याच्या सभोवती २०० मीटर अंतरावर नदी आहे. पूर आल्याने त्याचा परिणाम उसावर होतो, तसेच गाळपासाठी आडसाली ऊस न येता खोडवे निडवेसुद्धा गाळपासाठी घेतले जातात. कारखान्याचे कोणतेही बाय प्रॉडक्ट नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून आमचा दर कमी दिसत असल्याचे महाडिक यांनी सांगितले. कारखान्याने एकूण अकराशेपेक्षा जास्त मयत सभासदांचे २०१४ ते २०१९ या कालावधीत शेअर ट्रान्सफर केले असल्याचे त्यांनी स्पष्ट करतानाच डी. वाय. पाटील कारखान्याने किती मयत सभासद शेअर ट्रान्स्फर झाले.? डी.वाय. पाटील कारखान्याच्या सभासदांपैकी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील किती, टनेजला साखर किती देता, शेअर्सला साखर किती देता, आपल्या व आमच्या दरातील फरक किती सांगा, असा उलटा सवालही अमल महाडिक यांनी केला.शक्तिप्रदर्शनात सभासद की कार्यकर्तेकारखान्यात भ्रष्टाचाराची एक तरी घटना आमच्या कारखान्यात दाखवावी, असे आव्हानही महाडिक यांनी दिले. लवकरच आम्ही पाच हजार गाळप क्षमता व अठरा मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्प निर्माण करून कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे सांगत अमल महाडिक म्हणाले सहाशे सभासदांच्या ताब्यात कारखाना जाऊ नये असे ते म्हणतात तर मग अठराशे सभासदांवर आक्षेप का घेतला. त्यांच्या स्वतःच्या डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे पाच हजार सभासद एका रात्रीत कमी करून बावीसशे करून ठेवले. सोमवारी त्यांनी शक्तिप्रदर्शन केले; पण त्यामध्ये सभासद किती आणि कार्यकर्ते किती याचेही अवलोकन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राजाराम कारखाना निवडणूक: दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची सतेज यांना सवयच - अमल महाडिक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:59 AM