कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणूक छाननीत निवडणूक यंत्रणेने पोटनियमानुसारच अर्ज अपात्र ठरवले, मात्र विरोधकांनी यंत्रणेवरच आक्षेप घेतला. त्यातून ते मग्रुरीची भाषा वापरत असून ‘राजाराम’चे सभासद अशी भाषा सहन करणार नाहीत, मैदान अद्याप संपलेले नाही, ही तर सुरुवात आहे, असा इशारा माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्रकातून दिला. कारखान्याच्या १८९९ सभासदांना अपात्र ठरवताना तुमची ही भावना कोठे गेली होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहेत.कारखान्याच्या पोटनियमानुसार २९ लोकांचे अर्ज अपात्र ठरल्यानंतर विरोधकांचा जळफळाट होत आहे, मात्र १८९९ सभासदांना त्यांनी अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र त्यांची ही आपुलकीची भावना जागी झाली नाही. मुळात ज्यांना लोकशाही प्रक्रियाच मान्य नाही, असे लोक लोकशाहीचा आग्रह धरतात हा मोठा विनोद आहे. एवढ्यावर मैदान संपलेलं नाही, ही आता फक्त सुरुवात आहे. मग आताच एवढा आकांडतांडव कशाला?
विरोधी आघाडीतील हे २९ वगळता इतर उमेदवारांना घेऊन त्यांनी सक्षम पॅनल बनवावं, आम्ही आधीपासूनच मैदान लढवायला तयार आहोत. अर्ज अपात्र ठरवले म्हणून रागाने धमक्या व मग्रुरीची भाषा वापरत आहेत, मात्र हे सहन करायला हा काय डी. वाय. पाटील कारखाना नाही.मानेंनी रडत बसण्यापेक्षा खबरदारी का घेतली नाहीसर्जेराव माने यांनी ‘राजाराम’चे अध्यक्ष म्हणून काम केल्याने त्यांनी अनेक वेळा पोटनियमांचा अभ्यास केला आहे. अर्ज अपात्र ठरल्यानंतर रडत बसण्यापेक्षा अगोदरच खबरदारी का घेतली नाही? असा सवालही महाडिक यांनी केला.