आष्टा : माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी ज्येष्ठांचा आशीर्वाद व युवकांच्या साथीने राजारामबापू समूहाला राज्यात ओळख निर्माण करून दिली, तसेच राज्यात अर्थ, गृह व ग्रामविकासमंत्री म्हणून प्रभावी काम केली, असे गौरवोद्गार माजी सभापती आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी काढले़ आष्टा येथील आर्टस् अॅण्ड कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजित ‘जयंत अॅग्रो २०१५’ या राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशू-पक्षी प्रदर्शनाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे प्रामुख्याने उपस्थित होते़ प्रारंभी आ. वळसे-पाटील यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन, राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले़वळसे-पाटील म्हणाले की, अलीकडे राजकारण्यांबद्दल समाजात वेगळा दृष्टिकोन निर्माण झाला असताना, जयंतरावांनी समाजाशी एक नाते निर्माण केले आहे़ ऊस, उसाचा शेतकरी, सहकार व त्यातील राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते आपल्या तालुक्यातील युवा पिढीला आऱ आय़ टी़ च्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत़ तंत्रज्ञान, संशोधन व जगाची नवनवीन माहिती घेऊन त्याबरोबर आपल्या परिसरातील माणूस नेण्याची त्यांची धडपड सातत्याने सुरू आहे़ केवळ तालुका, जिल्हाच नव्हे, तर राज्यात त्यांचे नेतृत्व सुपरिचित झाले आहे़ त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी आपल्या कामगिरीतून देशपातळीवरही अनेक पारितोषिके मिळविली आहेत़ यावेळी त्यांनी राजारामबापूंच्या आठवणींना उजाळा देत कारखाना, बँक, दूध संघ व सूतगिरणीच्या प्रगतीचे कौतुक केले़ आमदार पाटील म्हणाले की, वाळवा तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक माहिती, तंत्रज्ञान प्रदर्शनातून मिळावे, ही भूमिका आहे़ आपला शेतकरी प्रयोगशील आहे, त्यास प्रदर्शनाच्या माध्यमातून अधिक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे़ माजी आमदार विलासराव शिंदे, नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील स्वागत केले. याप्रसंगी माजी आमदार मानसिंग नाईक, माजी आमदार सदाशिव पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, कऱ्हाडचे सारंग पाटील, अरूण लाड, लालासाहेब यादव, विश्वास पाटील, दिलीप पाटील, माणिकराव पाटील, प्रा़ शामराव पाटील, नेताजीराव पाटील, आनंदराव पाटील, बी़ डी़ पवार, शामरावकाका पाटील, विष्णुपंत शिंदे, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, विजयबापू पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, बी़ के पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ संग्राम फडतरे यांनी आभार मानले़ (वार्ताहर)यंदा मान्सून वेळेवर : साबळेयावेळी बोलताना हवामान तज्ज्ञ डॉ़. रामचंद्र साबळे म्हणाले की, आपण आपल्या साखर कारखान्याच्या सभासदांची नावे, गावे व मोबाईल क्रमांक द्या, आम्ही आपणास दर मंगळवारी हवामान अंदाजाची माहिती देऊ, अशी ग्वाही दिली़ डॉ़ साबळे म्हणाले, यावर्षी वेळेवर उन्हाळा सुरू झाल्याने यावर्षी मान्सूनही वेळेवर येणार आहे़ मार्च, एप्रिलमधील घडामोडी कशा होतात, याकडे लक्ष द्यावे लागेल़ मान्सून अवेळी येण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे़ आता हवामान, पीकपध्दतीबद्दल जागृती करण्याची गरज आहे़ आम्ही राज्यातील ८४ दुष्काळी तालुक्यांचा अभ्यास केला असून तेथील पाऊस, पीक पध्दती, पाणी साठवण व वापराचे योग्य नियोजन करावे लागेल़
राजारामबापू समूहाची राज्यभरात भरारी
By admin | Published: February 16, 2015 10:22 PM