कोल्हापूर : राजारामपुरी चौथ्या गल्लीमधील सिद्धकला अर्पाटमेंटमधील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून दागिने, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वस्तू असा सुमारे ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. बलिराम उमेश चौधरी (वय २६) शिवपाल बिनदाप्रसाद चौधरी (२१, दोघे, रा. माऊली पुतळा, राजारामपुरी कोल्हापूर, मूळ बिहारचे रहिवासी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धकला अर्पाटमेंटमधील अश्विनी सचिन खोत यांचा ब्युटीपार्लर व्यवसाय आहे. दि. २९ जून रोजी त्या एका लग्नसमारंभासाठी वाठार येथे गेल्या होत्या. घरी परतल्यानंतर त्यांना फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून चोरी झाल्याचे लक्षात आले. या घटनेत २० हजार रुपये सोन्याच्या दोन अंगठ्या, १० हजार रुपये किमतीचे कानांतील टॉप्स, सात हजार रुपयांची इमिटेशन ज्वेलरी, सहा हजार रुपये किमतीची रिंग लाईट, चार हजार रुपयांची साउंड सिस्टीम, तसेच हँड बॅग, हेअर ड्रायर, हेड फोन व रोख १२ हजार रुपये असा मुद्देमाल चोरीस गेला.
त्यांनी याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास करून बलिराम चौधरी आणि शिवपाल चौधरी यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेल्या मुद्देमालाबाबतची चौकशी सुरू आहे.