कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या राजाराम सहकारी साखर कारखाना व इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सची वीजजोडणी बुधवारी ‘महावितरण’कडून तोडण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाने ‘महावितरण’ने ही कारवाई केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्याची तसेच त्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी मुंबई उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्यावर सोपविली आहे. शनिवारी (दि. १८) कोल्हापुरात झालेल्या पंचगंगा नदी प्रदूषण आढावा बैठकीनंतर चोक्कलिंगम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर काही तासांत अनबालगन यांनी पंचगंगा प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर यांनी सोमवारी कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप व इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक शिंदे यांना राजाराम साखर कारखाना व इचलकरंजीतील प्रोसेसर्स संबंधितांना चोवीस तासांची नोटीस देऊन मंगळवारी वीज जोडणी तोडण्याची कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. मात्र संंबंधितांकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार ‘महावितरण’च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारी एक वाजता कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे उच्च दाबाचे कनेक्शन तोडले. तसेच इचलकरंजी येथील नऊ प्रोसेसर्सवरही सायंकाळी कारवाई करीत येथील वीजपुरवठाही तोडण्यात आला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानेच केली जाईल, असे ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर यांनी सांगितले. इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सचा मंगळवारी पाणीपुरवठा व बुधवारी वीजपुरवठा खंडित केल्याने दररोज होणारी बारा लाख मीटर कापडावरील प्रक्रिया ठप्प झाली आहे.पंचगंगा नदी प्रदूषणप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात कामगार नेते दत्ता माने व सदाशिव मलाबादे यांनी याचिका दाखल केली होती. प्रदूषण रोखण्याविषयी न्यायालयाने वारंवार निर्देश देऊनही मंडळाकडून हलगर्जीपणा होत असल्याबद्दल न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळावर ताशेरे ओढले. अखेर त्याची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. बुधवारी दिवसभरात महावितरण कंपनीने राधा-कन्हैय्या, सावंत, अरविंद कॉटसीन, राधामोहन, यशवंत, रघुनंदन, लक्ष्मी, हरिहर व डेक्कन या प्रोसेसर्सचा वीजपुरवठा खंडित केला. या प्रोसेसर्सकडे असलेली वीस स्ट्रेंटर यंत्रावरील कापडावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आता बंद पडली. त्यामुळे सुमारे दोन हजार कामगार बेरोजगार झाले आहेत.दरम्यान, औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालविणाऱ्या वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसर्स असोसिएशनने प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी शेती सिंचनासाठी देण्याची तयारी केली आहे. राणाप्रताप सोसायटीने हे पाणी घेण्याची तयारी दर्शविली असून, सुमारे तीस लाख रुपये खर्च करून थेट नळाद्वारे हे पाणी दीड किलोमीटरवर नेऊन देण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे प्रमुख लक्ष्मीकांत मर्दा यांनी दिली. तसेच आज, गुरुवारी उच्च न्यायालयात प्रदूषणासंदर्भात असलेल्या तारखेसाठी उपस्थित राहण्यास प्रोसेसर्स असोसिएशनचे एक शिष्टमंडळ बुधवारी रात्री उशिरा मुंबईस रवाना झाले. (प्रतिनिधी)
पाण्याबरोबर ‘राजाराम’ची वीजही तोडली
By admin | Published: April 23, 2015 1:00 AM