चंद्रकांतदादा, आता कोणत्या तोंडाने मते मागता..?, खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 11:38 AM2022-04-08T11:38:17+5:302022-04-08T11:40:24+5:30
कोल्हापुरातील एक ज्योतिषी पुणेवारी करीत आहे. सरकार आज पडणार, उद्या पडणार, ईडी याची चौकशी करणार, त्यांना अटक करणार असे वारंवार सांगत आहेत, अशी टीका खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.
कोल्हापूर : पाच वर्षे तुम्ही पालकमंत्री, राज्याच्या मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री होता, तेव्हा कोल्हापूर शहर, जिल्ह्याच्या विकासाठी काय केले? सत्तेत असताना तुम्ही येथील राजर्षी शाहू जन्मस्थळाला दमडीचीही मदत केली नाही. ते आता कोणत्या तोंडाने मते मागत आहेत, अशी विचारणा राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी येथे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना केली.
शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, शिवाजी पेठेत जे ठरते, ते राज्यात आणि देशात पसरते. यामुळे शिवाजी पेठेेने भरघोस मते देऊन जयश्री जाधव यांना आमदार करावे. कोल्हापूरला छत्रपती ताराराणी यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे. त्याच भूमीत विरोधकांकडून एका प्लंबरचे, इलेक्ट्रिशियनचे काम त्यांच्या पत्नीला जमते का ? ज्यांचे काम त्यांनीच करावे, असे सांगत महिलांचा अवमान केला आहे. त्यांना शिवाजी पेठेतील महिलांनी धडा शिकवावा.
माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, सत्तेचा माज आणि लालसेपोटी भाजपने उत्तरची पोटनिवडणूक लादली. त्यांच्या विजयाचा वारू कोल्हापूरची स्वाभिमानी जनता निश्चितपणे रोखणार आहे. जाती, जातीमध्ये तेढ निर्माण करून मतांची पोळी भाजून घेणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हे काम शिवाजी पेठेतील मतदार निश्चितपणे करतील.
क्षीरसागर म्हणाले, पालकमंत्री असताना गणेशोत्सव बंद पाडण्याचे काम केलेले आता मते मागत फिरत आहेत. त्यांना कोल्हापूरची जनता हिमालयात पाठवतील.
यावेळी उमेदवार जयश्री जाधव यांनी दिवंगत चंद्रकांत जाधव यांची अपुरी विकासकामे पूर्ण करण्यासाठी संधी देण्याचे आवाहन केले. माजी आमदार सुरेश साळोखे, भारती पोवार यांची भाषणे झाली. सभेस शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी महापौर सई खराडे, आर. के. पोवार, रविकिरण इंगवले, विजय देवणे, संजय पवार, सरला पाटील, शिवाजी जाधव, उत्तम कोराणे, सचिन चव्हाण, विक्रम जरग, अजय इंगवले, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, खासदार डॉ. कोल्हे यांची कदमवाडीतही सभा झाली.
शिवाजी पेठेचं ठरलंय..
यावेळी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी शिवाजी पेठेचं ठरलयं, जयश्री जाधव यांना आमदार करायचं, असे सांगितले.
ज्योतिषीची पुणेवारी
कोल्हापुरातील एक ज्योतिषी पुणेवारी करीत आहे. सरकार आज पडणार, उद्या पडणार, ईडी याची चौकशी करणार, त्यांना अटक करणार असे वारंवार सांगत आहेत, अशी टीका खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.