कोल्हापूर : राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंट्स बँकेच्या निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र पंदारे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षि शाहू सत्तारुढ पॅनेलने १५ पैकी १४ जागा जिंकत सत्ता कायम राखली. विरोधी बाळासाहेब घुणकीकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षि शाहू स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलला एक जागा मिळाली. अमित अवसरे, अनिल सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शिवाजी महाराज युवा पॅनेलने चांगली लढत दिली.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग अशा सात जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेसाठी रविवारी ४४.४५ टक्के मतदान झाले होते. मंगळवारी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये सकाळी आठपासून मतमोजणीस सुरुवात झाली. ४० टेबलवर झालेल्या मोजणीमध्ये पहिल्यांदा सर्वसाधारण गटातील निकाल लागला. त्यानंतर राखीव गटातील मोजणी पूर्ण झाल्यानंतर, दुपारी चार वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी निकाल घोषीत केला. सत्तारुढ गटाच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. तर काही उमेदवारांनी शहरातून मिरवणूक काढली.
प्रकाश पाटील पहिल्यापासून आघाडीवर
सर्वसाधारण गटात सत्तारुढ पॅनेलचे ९ व विरोधी पॅनेलचे प्रकाश पाटील हे आघाडीवर राहिले. निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांनी सत्तारुढ गटाशी फारकत घेत विरोधी छावणीत दाखल झाले होते.
‘युवक’ने ‘परिवर्तन’चे मनसुबे उधळले
परिवर्तन पॅनेलमध्ये संधी न मिळाल्याने युवक पॅनेलने निवडणुकीत शड्डू ठोकला होता. नवखे उमेदवार असून त्यांनी घेतलेली मते आत्मचिंतन करायला लावणारी आहेत. परिवर्तन पॅनेलचे बहुतांशी उमेदवार हे २०० ते ४०० मतांनी पराभूत झाली. ‘युवक’ पॅनेलमुळेच परिवर्तनला दणका बसल्याची चर्चा सुरू आहे.
तिसऱ्यांदा बँकेवर सत्तारुढ आघाडीने विजय मिळविला. सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून यापुढेही चांगले कामकाज केले जाईल. - रवींद्र पंदारे, सत्तारुढ पॅनेल
सत्तारुढ आघाडीने पैशांच्या जोरावर विजय मिळविला आहे. यापूर्वीच्या बँकेच्या निवडणुकीत नसलेल्या प्रथा सत्तारुढवाल्यांनी पाडल्या. -प्रकाश पाटील, परिवर्तन पॅनेल
युवक पॅनेलमध्ये नवखे उमेदवार असूनही चांगली लढत दिली. आमच्यामुळेच बँकेतील परिवर्तनला ब्रेक लागला. - अमित अवसरे, युवक पॅनेल