कोल्हापूर : राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को-ऑप. बँकेसाठी रविवारी, २० हजार ७८८ पैकी ९२४१ मतदारांनी (४४.४५ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ बाचाबाची वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. तिन्ही पॅनेलकडून मतदारांना आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते.
गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या १५ जागांसाठी न्यू एज्यूकेशन सोसायटी व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग येथे मतदान झाले. ‘राजर्षि शाहू सत्तारुढ पॅनेल’, ‘राजर्षि शाहू स्वाभिमानी परिवर्तन पॅनेल’ व छत्रपती शिवाजी महाराज युवा पॅनेल, अशी तिरंगी लढत झाली होती. बँकेचे २० हजार ७८८ मतदार मतदानासाठी पात्र होते. प्रचाराची गती व साधनांचा केलेला वापर पाहता मतदानाचा टक्का वाढेल, असे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात मतदारांचा प्रतिसाद कमी मिळाला. ९ हजार २४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
उद्या, मंगळवारी सकाळी आठ वाजता रमण मळा येथील शासकीय बहूद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. ४० टेबलवर मोजणी केली जाणार असून, साधारणत: सायंकाळी सहापर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, सहायक निबंधक प्रदीप मालगावे, नारायण परजणे यांनी काम पाहिले.
बाहेर गर्दी, केंद्रात शुकशुकाट
मतदान केंद्राबाहेर सकाळी प्रचंड गर्दी होती; मात्र मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. तिन्ही पॅनेलच्या उमेदवारांचे समर्थक पद्माराजे गर्ल्स हायस्कूल परिसरात गर्दी केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
विजयाच्या घोषणा अन् गुलाल
सकाळपासूनच युवा पॅनेलचे उमेदवार मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी करत होते. मतदान संपल्यानंतर सत्तारुढ व युवा पॅनेलने विजयाच्या घोषणा दिल्या. सत्तारुढ गटाने प्रत्येकाला गुलाल लावत विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला.
पोलीस निरीक्षकांची तराटणी
घोषणाबाजी व ढकलाढकलीने काही काळ गोंधळ उडाला होता. पोलिसांनी अनेक वेळा सांगूनही ऐकत नसल्याचे पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे येऊन उमेदवारांना तराटणी दिली.
सेवानिवृत्तांचा उत्साह...नियमित कर्मचाऱ्यांची पाठ
बँकेच्या एकूण मतांपैकी ६० टक्के मतदान हे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आहे. त्यामुळे सकाळपासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये मतदानासाठी उत्साह पहावयास मिळतो; मात्र नियमित कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवल्याने मतदानाचा टक्का घसरल्याचे पॅनेल प्रमुखांनी सांगितले.