डॉ. जयसिंगराव पवार
रयतेचे राज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे द्रष्टेपण दाखविले. त्यांच्यानंतर हेच द्रष्टेपण केवळ आणि केवळ छत्रपती शाहू महाराजांनी दाखवले असा माझ्या अभ्यास सांगतो. शाहू महाराजांचा चरित्रकार म्हणून मला अनेकजण त्यांचा सर्वांत तुम्हांला महत्त्वाचा वाटणारा असा गुण कोणता अशी विचारणा करतात. मी पटकन उत्तर देतो ‘द्रष्टेपणा’.द्रष्टेपणा म्हणजे काय तर क्षितिजाच्या पलीकडच्या क्षितिजांच्या पुढचं पाहणारा तो द्रष्टा. शाहू महाराजांच्या कारभाराचा आढावा घेत असताना पदोपदी त्यांचे हे द्रष्टेपण जाणवते. म्हणूनच ते भारतभरातील इतर अनेक संस्थानिकांपेक्षा वेगळे ठरतात. काही उदाहरणांच्या माध्यमातून हे मी स्पष्ट करतो. सन १९१९. ज्या वेळी भारतामध्ये किमान ५००हून अधिक संस्थानिक होते. भारतावर ब्रिटिशांचा अंमल होता. परंतु एकमेव शाहू महाराजांनी या काळात कौटुंबिक हिंसाचाराविरोधात कायदा केला. जो भारताच्या संसदेने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ५८ वर्षांनी २००५ मध्ये केला. चर्चेतून मला समजले की अमेरिका आणि ब्रिटनमध्येही त्यावेळी असा कायदा अस्तित्वात नव्हता. हे आहे द्रष्टेपण.
आज हजारो कोटी रुपये खर्च करूनही आपण आवश्यक जमीन ओलिताखाली आणू शकलो नाही हे भीषण वास्तव आहे. ज्यावेळी शिक्षकाला सहा रुपये पगार होता त्यावेळी शाहू महाराजांनी दरवर्षी एक लाख रुपये राधानगरी धरणासाठी खर्च करण्यास सुरुवात केली होती. आज संपूर्ण देशात कोल्हापूर जिल्हा दरडोई उत्पन्नामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचे मूळ राधानगरी धरणामध्ये आहे. हे विसरता कामा नये. हे आहे जलनीतिचे द्रष्टेपण.बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्यासारखे काही सन्माननीय अपवाद साेडले, तर बहुतांशी संस्थानिक हे आपल्याच संस्थानामध्ये गुंतलेले असत. संस्थानाबाहेरच्या माणसाचा फारसा विचार त्यांच्याकडून कधीच झाला नाही. परंतु शाहू महाराजांनी आपल्या संस्थानाबरोबरच देशातील प्रत्येकजण माझा आहे ही राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला. ते स्वत:ला हमालही म्हणवून घ्यायचे. कारण हा माणूस कधीच राजेपण मिरवत राहिला नाही. उलट दिल्लीपासून, कानपूरपर्यंत, हुबळीपासून ते नागपूरपर्यंत जनतेत फिरत राहिला. हे आहे त्यांचे द्रष्टेपण.
सध्या हिंदुत्वावरून काय सुरू आहे हे आपण पाहत आहोत. शाहू महाराज हिंदू आणि वैदिक धर्म मानणारे होते. परंतु माझे हिंदुत्व, माझा धर्म हा उंबरठ्याच्या आत असला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती. धर्माचा अभिमान जरूर असावा, त्याचे आचरण ज्याने त्याने वैयक्तिक पातळीवर करावेही. त्याला शाहू महाराजांचा अजिबात विरोध नव्हता. परंतु हा धर्म राष्ट्रवादाच्या, राष्ट्रीयत्वाच्या आड येता कामा नये असे त्यांचे ठाम म्हणणे होते.
राजदंडाचा वापर लोककल्याणासाठीभारतामध्ये अनेक संस्थानिक होते. परंतु अनेकजण वैयक्तिक आयुष्य उपभाेगण्यामध्ये मश्गुल होते. अनेक संस्थानिकांच्या ऐश्वर्य उपभोगण्याच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. त्यांचा खासगी खजिना कशासाठी रिता केला जात असे हेही अनेकांना माहिती आहे. परंतु अशावेळी समाजातील सामान्यातल्या सामान्य माणसाला उराशी कवटाळून त्याच्या भल्यासाठी, शिक्षणासाठी, सामाजिक स्वास्थ्यासाठी, उत्थानासाठी अखंडपणे कार्यरत राहिलेला राजा म्हणजे फक्त छत्रपती शाहू महाराज होय.