डॉ. मंजूश्री पवारआधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचे अध्वर्यू असलेल्या शाहू-फुले आणि आंबेडकर यांच्यामध्ये शाहू महाराजांचे वेगळेपण दिसून येते. कारण राजा असूनही त्यांनी समाजक्रांतीसाठी राजदंडाचा वापर केला. आपले छत्रपतीपद आणि अधिकारांचा वापर सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी करणारा हा लोकराजा होता. राजर्षी शाहू महाराजांनी महिला, बहुजन, मागासवर्गिय, दलित, भटके विमुक्त, शोषितांसाठी केलेल्या कार्यापैकी स्त्रियांच्या उद्धारासाठीचे काम हे मानवमुक्तीच्या कार्यात मोडते.बहुजन रयतेतील अर्धा भाग असलेल्या स्त्रियांना पुरुषी वर्चस्वाच्या अवस्थेतून बाहेर काढायचे असेल तर त्यांना शिक्षण दिले पाहिजे हे हेरून त्यांनी स्त्री शिक्षणाला सुधारणावादी कारभाराचा भाग बनवला. प्राथमिक शिक्षणात स्त्री शिक्षणाचा समावेश केलाच; पण डोंगरी, ग्रामीण, मागासलेल्या भागात, चांभार, ढोर, अशा वंचित जाती-जमातींमधील मुलींसाठी वेगळ्या शाळा काढल्या. शिक्षकांनी मुलींच्या शिक्षणात रस घ्यावा म्हणून मुलींची संख्या व त्यांच्या प्रगतीवर शिक्षकांना बक्षिसे ठेवली.त्यांनी १९१९ मध्ये एक हुकूम काढला ज्यात ज्या मागासवर्गीय महिला शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी दरबारकडून मोफत राहण्या व जेवणाची सोय करण्यात आली. अक्कासाहेब महाराज यांच्या विवाहानिमित्त महाराष्ट्र व गुजरातमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सुरू केली. कोल्हापूरमध्ये फिमेल ट्रेनिंग स्कूलमधील मिस लिटल या शिक्षिका निवृत्त झाल्यानंतर रखमाबाई केळवकर या बुद्धिमान स्त्रीची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. अल्बर्ट मेमोरियलमध्ये स्त्री विभाग सुरू केला जिथे रखमाबाई यांच्या कन्या कृष्णाबाई केळवकर यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली.एवढ्यावरच न थांबता त्यांनी कृष्णाबाईंना उच्च शिक्षणासाठी मुंबईच्या ग्रॅन्ड मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले. तिथून पुढे इंग्लंडला पाठवले. स्त्रियांचा राजकीय क्षेत्रातदेखील वावर हवा या उद्देशाने १८९५ साली झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात केळवकरांना स्त्री प्रतिनिधी म्हणून पाठवले. आपल्या भाेवती राजकीय-सामाजिक चळवळीतील अनेक जाणकार असताना त्यांनी जाणीवपूर्वक दोन महिलांची निवड केली.स्त्री उद्धार आणि राजर्षी शाहू महाराज हा विषय मांडताना त्यांच्या स्नुषा इंदुमती सरकार यांचा उल्लेख झालाच पाहिजे. मुलगा प्रिन्स शिवाजी यांच्या निधनानंतर इंदुमती या आपल्या ११ वर्षाच्या स्नुषेला त्यांनी राज कुटुंबाचा रोष पत्करून शिक्षणासाठी सोनतळीला ठेवले. त्यांच्यामध्ये सामाजिक भान यावे म्हणून त्यांच्यासोबत चार वेगवेगळ्या जाती-धर्मातील मुली शिक्षणासाठी ठेवल्या.इंदुमती सरकार या डॉक्टर व्हाव्यात अशी महाराजांची इच्छा होती, त्यासाठी त्यांचे लेडी हार्डिंग जनाना मेडिकल कॉलजमध्ये ॲडमिशनदेखील केली, पण दरम्यान शाहू महाराजांचे निधन झाल्याने त्यांचा हा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. शिक्षण आणि कायद्याद्वारे प्रस्थापित समाजरचना आणि स्त्रीमुक्तीचे शस्त्र शाहू महाराजांनी स्त्रियांच्याच हाती दिले. शाहूंचे वारसदार म्हणून आज समाजाने स्त्रीकडे बघताना शाहू महाराजांप्रमाणे दृष्टिकोन ठेवला पाहिजे.
स्त्रियांचे जीवन बदलणारे पाच कायदे
स्त्रियांना पुरुषप्रधानतेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी शाहू महाराजांनी क्रांती घडवणारे पाच कायदे केले. विधवा पुनर्विवाह कायदा १९१७, आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह कायदा घरगुती छळ प्रतिबंधक कायदा१९१९, काडीमोड कायदा असे कायदे केले. एवढेच नव्हे तर अनौरस संतती व जोगतीण सर्वात उपेक्षित स्त्री वर्गाच्या उद्धारासाठीही त्यांनी काम केले.
लेखिका इतिहासाच्या अभ्यासक व संशोधक आहेत