डॉ. रमेश जाधवकला, क्रीडा आणि सामाजिक चळवळीला भरभक्कम पाठबळ देणाऱ्या शाहू महाराजांनी तत्कालीन साहित्यिक, लेखक आणि पत्रकार, संपादकांनाही मोठा आधार दिला होता. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा मूलमंत्र जपणाऱ्या शाहू महाराजांनी लेखक, कवी, शाहीर, संशोधक आणि पत्रकार या सर्वच साहत्यिक मंडळींवर उदंड प्रेम केले. त्यांना भरभरून आर्थिक साहाय्य केले. त्यांच्या अडीअडचणीच्या काळात हा राजा त्यांच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. एखाद दुसरा अपवाद वगळता आपण मदत केलेले साहित्यिक, लेखक आपले आश्रित आहेत, असे वर्तन शाहू छत्रपतींकडून कधीही झालेले आढळत नाही.प्रबोधनकार ठाकरे यांचा १९१८ पासून शाहू महाराजांशी स्नेह सुरू झाला. ठाकरे त्यावेळी ‘भिक्षुकशाहीचे बंड’ हे पुस्तक लिहीत होते. याबाबत त्यांनी महाराजांच्या भेटीवेळी कोणत्या संदर्भग्रंथांचा उपयोग करावा अशी विचारणा केली. तेव्हा राजांनी अनेक इंग्लिश ग्रंथांची नावे सांगितली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी ते ग्रंथ आपल्या खर्चाने ठाकरे यांना दिले. शिवाय ५ हजार रुपयांचा आगाऊ धनादेश देऊन त्यांच्या २ हजार प्रती खरेदीही केल्या. ‘वेदोक्त’ प्रकरणात टिळकांची बाजू घेणाऱ्या प्रा. वि. गो. विजापूरकर यांच्या ‘ग्रंथमाला’ मासिकालाही महाराजांनी वार्षिक पाचशे रुपये अनुदान मंजूर केले होते. महाराजांनी दिलेली आर्थिक मदत आणि प्रोत्साहन यामुळे दिनकरराव जवळकरांसारख्या बहुगुणी लेखकाच्या प्रतिभेला बहर आला होता यात शंका नाही.
प्रसिध्द शाहीर लहरी हैदर संध्यामठ गल्लीत एका पडक्या जागेत राहत होते. शाहू छत्रपतींनी म्युनिसिपल कमिटीच्या चेअरमनला खास लेखी हुकूम काढून ३० ऑक्टोबर १९२१ रोजी ती जागा लहरी हैदर यांना मोफत दिली. इतकेच नव्हे तर दरबारातून त्या ठिकाणी नवी इमारत बांधण्यासाठी लागणारे दगड आणि माती यांचाही पुरवठा केला.
बहुजन समाजातील पहिले शिवचरित्रकार कृष्णराव केळुसकर यांच्या शिवचरित्रास शाहू महाराजांनी एक हजार रुपयांचे पारितोषिक दिले. एक हजार ग्रंथप्रती घेतल्या. अशा अनेक साहित्यिक मंडळींना आपण मदत करतो म्हणून त्यांनी आपल्या आश्रितांसारखे रहावे अशी महाराजांची कधीच इच्छा नव्हती. त्यामुळेच ‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकरांना ४ हजार रुपयांची मदत करूनही ‘तुम्ही माझी बाजू तुम्हांला त्रास होत असेल तर तुमच्या पत्रकात मांडू नका’ अशी विनंती ३ जून १९२१ रोजी अच्युतरावांना पाठवलेल्या पत्रात महाराज करतात. यातून त्यांच्या विशाल मनाचे आणि साहित्यप्रेमाचे दर्शन घडते. अशा असंख्य साहित्यिक, कलाकारांना शाहू महाराजांनी उदार हस्ते मदत केली, ज्यांच्या नावांची संख्या खूपच मोठी आहे.
कारकुन बनला राजकवी
आप्पाजी धुंडीराम मुरतुले ऊर्फ कवी सुमंत हे छत्रपतींच्या खासगी खात्यात कारकून होते. परंतु काव्यात रमणाऱ्या सुमंत यांच्यामुळे त्यांच्याकडून नोकरीचे काम होईना. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुमंत यांना नोकरीतून मुक्त करावे अशी महाराजांकडे मागणी केली. त्यानुसार सुमंत यांना कमी करतानाच त्याच्या घरासाठी धान्याचा पुरवठा करण्याचा आदेश महाराजांनी दिला. एवढेच नव्हे तर ते म्हणाले, ‘रावसाहेब, हा कारकून म्हणून जन्माला आलेला नाही. तो एक महाकवी म्हणून जन्मास आलेला आहे. त्याच्या सन्मानातच आमच्या दरबारचाही सन्मान होणार आहे.’ यानंतर त्यांची ३५ रुपये मानधनावर राजकवी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
(लेखक महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या राजर्षी शाहू गौरव ग्रंथाचे संपादक आहेत.)