शाहू छत्रपती
महात्मा जोतिबा फुले यांनी समाजातील पुरोहितशाही, अज्ञान व अस्पृष्यता नाहीशी करण्यासाठी चळवळ सुरू केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी हीच चळवळ आपल्या संस्थानात प्रत्यक्ष कृतीद्वारे चालू ठेवली. उपेक्षित, वंचित समाजाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले- शाहूंच्या विचारांचा प्रत्यक्ष भारतीय राज्यघटनेत समावेश करून खरी लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या तीन समाज सुधारकांनी सुरू केलेले समाजोद्धाराचे कार्य अजून संपलेले नाही. उलट सध्याची देशातील राजकीय तसेच सामाजिक परिस्थिती पाहता या महान समाज सुधारकांचे कार्य आणि विचार अधिक नेटाने, व्यापक पातळीवर पुढे नेण्याची आवश्यकता आहे.
राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानच्या गादीवर विराजमान झाले तेव्हा त्यांनी बहुजन समाजाला आपल्या कार्याचा केंद्रबिंदू मानले. राजा असूनही ऋषींसारखे जीवन जगताना त्यांनी आपल्या राजदंडाचा वापर हा दलित-पतित, तसेच दीनदुबळ्या, वंचित घटकांसाठी केला; परंतु ज्यांना आपले वर्चस्व समाजाच्या प्रत्येक घटकावर राहिले पाहिजे असे वाटत होते, त्या प्रतिगामी शक्तींनी त्यास विरोध केला. त्यांच्या कार्यात खोडा घालण्याचे प्रयत्न केले; परंतु शाहू महाराजांच्या लोककल्याणी कार्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
शाहू महाराजांसह अनेक समाज सुधारकांनी प्रत्यक्षात कृतीतून धर्मनिरपेक्ष समाजनिर्मितीचे प्रयत्न केले. आज मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. जाती, धर्माच्या नावावर समाजात दुही माजविण्याचे प्रयत्न होत आहेत. धार्मिक द्वेष भडकावण्याचा प्रयत्न होत आहे. मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा, महाआरती यासारखे समाजात दुफळी निर्माण करणारे विषय पुढे आणले जाऊ लागले आहेत.
सत्ता व वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता समाजाचे ध्रुवीकरण केले जात आहे. हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणून मुस्लिमांना वेगळे केले जात आहे. हिंदू आणि हिंदुत्व हेच काहींना माहीत नाही. पूर्वीच्या काळी सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांना देशाबाहेरून आलेल्या मुस्लीम लोकांनी हिंदू नाव दिले. रामाने, श्रीकृष्णाने हिंदू हा शब्द कुठे उच्चारल्याचे वाचनात आलेले नाही. हिंदुत्व म्हणजे बंधुभावाने वागणे, ही व्याख्या लोकशाहीत बसणारी आहे.
फुले, शाहू, आंबेडकर यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवर तयार झालेल्या राज्यघटनेमुळे लोकशाहीत सर्वांना समान हक्क व न्याय मिळाला; परंतु हा हक्क व न्याय आज खऱ्या अर्थाने मिळतो का, हाच प्रश्न आहे. आज पोशाख कोणता घालावा, काय खावे काय नको, यावर निर्बंध आणले जात आहेत, हे दुर्दैवी आहे. समाजसुधारकांच्या विचारांपासून समाजाला उलट्या दिशेने नेण्याचा उद्योग सुरू आहे. तथापि, महाराष्ट्राच्या भूमीत फुले- शाहू- आंबेडकर यांचे विचार खोलवर रुजले आहेत, रुजविण्याचा प्रयत्न आजही होत आहे. म्हणूनच देशातील राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता फुले, शाहू, आंबेडकर यांचे कार्य संपलेले नाही, तर अधिक गतीने पुढे नेण्याची आवश्यकता आहे.