लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांना आजपर्यंत छायाचित्रांद्वारे अनेकांनी पाहिले आहे; पण पहिल्यांदाच त्यांची चित्रफीतही सापडली आहे. या दुर्मीळ चित्रफितीमधील राजर्षी शाहू महाराज यांना पाहून करवीरवासीय शुक्रवारी सायंकाळी भारावले. यानंतर राजर्षी शाहूंच्या जयजयकाराने भवानी मंडपाचा परिसर दुमदुमून गेला.शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे भवानी मंडपाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात ही दुर्मीळ चित्रफीत दाखविण्यात आली. यात सन १९२२ मध्ये दिल्ली दरबारी प्रिन्स आॅफ वेल्स यांच्या भेटीसाठी राजर्षी शाहू महाराज गेले होते. त्यावेळची ही चित्रफीत असून, ती पाहून करवीरवासीय भारावून गेले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाराणी ताराराणी की जय, राजर्षी शाहू महाराज की जय, अशा घोषणा देत उभे राहून अभिवादन केले. दरम्यान, याबाबत चित्रफितीबाबत शाहीर राजू राऊत यांनी सांगितले की, माझ्या संग्रहामध्ये छत्रपती घराण्याशी संबंधित दुर्मीळ छायाचित्रे, छत्रपती राजाराम महाराज यांची चित्रफीत आहे. राजर्षी शाहू महाराज यांची चित्रफीत असावी, अशी इच्छा होती. त्यासाठी माझा विविध मित्रांच्या माध्यमातून शोध सुरू होता. यात माझे सहकारी राम यादव यांनी ‘कोलोनियल फिल्म आॅफ इंडिया’ या संकेतस्थळाची माहिती दिली. मात्र, त्यावरील राजर्षी शाहूंची चित्रफीतच नेमकी नाहीशी झाली होती. यावर लंडनमधील राम कर्णिक, रिचा वोरा त्यांना संबंधित चित्रफितीचा शोध घेण्याबाबत ई-मेल केले. राजर्षींना एका नजरेत तरी पाहण्यासाठी आमची धडपड सुरू होती. यानंतर गुरुवारी (दि. २१) रात्री प्रशांत आयरेकर हे इंटरनेटवर सर्चिंग करताना त्यांना यामध्ये संबंधित दुर्मीळ चित्रफीत सापडली. ती अजित आयरेकर यांनी उपलब्ध करून दिली. अशा पद्धतीने पहिल्यादांच चित्रफितीद्वारे राजर्षी शाहू महाराज यांचे दर्शन घडले. ही चित्रफीत सन १९२२ मधील असून यात राजर्षी शाहू महाराज यांच्याबरोबर थोरले युवराज छत्रपती राजाराम हेही दिसतात.कोल्हापुरात शुक्रवारी भवानी मंडप परिसरात राजर्षी शाहू महाराज यांची दुर्मीळ चित्रपीत दाखविण्यात आली. करवीरवासीयांना पहिल्यांदाच चित्रफितीद्वारे राजर्षी शाहूंचे दर्शन घडले. कोल्हापुरात शुक्रवारी भवानी मंडप परिसरात राजर्षी शाहू महाराज यांची दुर्मीळ चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी उपस्थित करवीरवासीय, नागरिकांनी उभे राहून लोकराजांना अभिवादन केले.
राजर्षी शाहूंची दुर्मीळ चित्रफीत सापडली--दर्शनाने करवीरवासीय भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 10:39 PM
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांना आजपर्यंत छायाचित्रांद्वारे अनेकांनी पाहिले आहे; पण पहिल्यांदाच त्यांची चित्रफीतही सापडली आहे. या दुर्मीळ चित्रफितीमधील राजर्षी शाहू महाराज यांना पाहून करवीरवासीय शुक्रवारी सायंकाळी भारावले.
ठळक मुद्देजयजयकाराने भवानी मंडप दुमदुमला