संघटन कौशल्याच्या जोरावर उभारी मिळालेले राजेखान जमादार हे व्यक्तिमत्त्व अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असणाऱ्या जमादार चौकातील या व्यक्तिमत्त्वाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. राजेखान प्रा. संजय मंडलिक यांना राजकारणातील गुरू मानतात. शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांतील प्रभावातून संजयदादांनी पहिल्यांदा मुरगुड पालिकेत जमादार यांना संधी दिली. इथून राजेखान यांच्या राजकीय वाटचालीचा आलेख चढता राहिला. सामाजिक कार्याचा पिंड आणि आजोबा पै. बाळासाहेब जमादारांचा वारसा लाभल्यामुळे शालेय व महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी नेतृत्व गुणाची चमक दाखवली. सर्वांशी मिळून-मिसळून वागणे, दुसऱ्यांच्या समस्या आपल्या समजून सोडवणे, अन्यायाविरुद्ध धाडसाने लढा देणे आणि एखाद्या सार्वजनिक प्रश्नाचा उठाव करण्यासाठी संघटन करणे यामुळेच नगराध्यक्ष जमादार आबालवृद्धांमध्ये प्रिय आहेत.
हिंदू आणि ख्रिश्चन मित्रांबरोबर अधिक समरसतेने त्यांचा नेहमी वावर असतो. समाजकारणाची तळमळ असणाऱ्या त्यांच्या पुरोगामी विचारसरणीमुळे विद्यार्थी दशेतच त्यांना देवचंद कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरीपद मिळाले. हे नेतृत्व गुण त्यांना पुढील राजकीय वाटचालीची नांदी ठरली. वयाच्या २१ व्या वर्षी ते पहिल्यांदा नगरसेवक बनले. परिस्थितीचे चटके सहन करीत वडिलांच्या निधनानंतर मोठे बंधू अमीर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घ्यायला सुरुवात केली. एका अपघातात आमिर आकस्मिक दुरावले, आणि दैवाची चक्रे विचित्रपणे फिरत गेली; पण जमादार यांनी कधीही हार मानली नाही किंवा जिद्दही सोडली नाही.
प्राथमिक, माध्यमिक शिक्षण, जीवन शिक्षण व मुरगुड विद्यालयात पूर्ण करून १९८६मध्ये देवचंद कॉलेजमध्ये ज्युनिअर जी.एस. तर १९८९मध्ये सिनिअर जी. एस.पदी त्यांची निवड झाली, हीच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात होती. १९९५ ला सदाशिवराव मंडलिक यांनी एस.टी. महामंडळाच्या सल्लागारपदी त्यांची निवड केली. १९९६ला मुरगुड पालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक म्हणून ते निवडणून आले. १९९८ मध्ये उपनगराध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली. त्यावेळी दिवंगत खासदार मंडलिक यांच्या प्रयत्नातून मुरगुडात २ कोटींची विकासकामे आणली. याचदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा निर्धार करत जमादार यांनी अनेक मित्र जमवले, माणसे मिळवली, संघटना उभी केली. यामधूनच तरुण मित्रांना एकत्र करीत पुरोगामी विचारांचे स्वतंत्र संघटन आर. जे. ग्रुपच्या माध्यमातून बळकट केले. मुरगुड शहरात राष्ट्रीय, राज्य स्तरावर त्यांनी व्हॉलीबॉल आणि कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले. इतकेच नव्हे तर हिंदू समाजाचा मोठा सण दसऱ्याला उत्सवाचे रूप देण्याचे कार्य जमादार यांनी केले. जमादार चौक मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी दसरा महोत्सव आणि आगळा-वेगळा गणेश उत्सव साजरा करून लक्ष वेधून घेतले. नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रजासत्ताकदिनी तुकाराम चौकात सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात करून नवीन पायंडा पाडला.
गोरगरिबांसाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. शहर आणि परिसरातील शेकडो रुग्णांच्या शस्त्रक्रियांबरोबरच हजारो लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ व दारिद्र्यरेषेखालील पिवळे रेशनकार्ड लोकांना मिळवून देण्याच्या मोहिमेत ते तालुक्यात अग्रभागी होते. गंभीर स्वरूपाचे रुग्ण ऑपरेशन करून आणण्यात त्यांना कमालीचा उत्साह असतो. शेकडो शस्त्रक्रिया करून आणलेले रुग्ण आजही त्यांना देव मानतात. बिद्री साखर कारखान्यात संचालकपदावरही त्यांनी उठावदार कामगिरी केली. आरटीओ कॅम्प, गरजूंना रक्तपेढीतून रक्त मिळवून देणे, निराधारांना पेन्शन योजनेचा लाभ, अनेकांना नोकऱ्या व रेशनकार्ड मिळवून देणे याद्वारे त्यांनी आपल्या सामाजिक कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या समाजसेवेची पोचपावती म्हणून मतदारांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना थेट लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी पदावर निवडून आणले. ‘देवचंद कॉलेजचे जनरल सेक्रेटरी ते नगराध्यक्ष!’ हा त्यांचा प्रवास नेतृत्वगुणांचा कस लावणारा ठरला आहे. अपवादात्मक परिस्थितीत वगळता मंडलिक गटाचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून त्यांनी आजपर्यंत काम पाहिले आहे. अनेक विकासकामे करण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचा आशीर्वाद आणि संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली ‘भ्रष्टाचारमुक्त मुरगुड’ हा प्रचाराचा मुद्दा घेत मुरगुड पालिकेत सत्ताबदल घडवण्यात जमादार अग्रभागी होते. विरोधी गटावर जहाल व आक्रमकपणे टीका करत जनमत आकर्षित करण्याची त्यांची वेगळी खुबी आहे. सामान्यांच्या सुख-दुःखात समरस होण्याच्या त्यांच्या वृत्तीला सलाम आणि वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !
--
अमर सनगर,
विजय मोरबाळे