कोल्हापूर : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सन २०१५-१६ सालाकरिता झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अॅड. राजेंद्र एल. चव्हाण, तर उपाध्यक्षपदी अॅड. प्रशांत वाय. चिटणीस यांनी बाजी मारली. यामध्ये अॅड. राजेंद्र लालासाहेब चव्हाण पॅनेलच्या ११, अॅड. गिरीश के. नाईक पॅनेलच्या ३, तर अॅड. व्ही. आर. पाटील पॅनेलची फक्त एक जागा निवडून आली. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून व गुलाल उधळून जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा व सत्र न्यायालय येथील बार असोसिएशनच्या कार्यालयात शनिवारी सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली. तिन्ही पॅनेलचे उमेदवार, पॅनेलप्रमुख व स्वतंत्र उमेदवार या ठिकाणी थांबून होते. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांचे स्वागत करून त्यांना मतदान करण्याचे आवाहन ते करीत होते. इतर निवडणुकांप्रमाणे या ठिकाणीही मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसत होता. रणरणत्या उन्हात मतदार आपला हक्क बजावीत होते. तीन पॅनेल व स्वतंत्र उमेदवारांमुळे निवडणुकीला चांगलीच रंगत आली होती. त्यामुळे अत्यंत चुरशीने मतदान होऊन सायंकाळी पाच वाजता म्हणजे मतदान संपेपर्यंत ६४.५९ टक्के इतके मतदान झाले. एकूण २१९२ सभासद मतदारांपैकी १४१६ इतक्या मतदारांनी आपला हक्क बजावला. सायंकाळी साडेसहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवृत्त सरकारी वकील सुभाष पिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर करण्यात आला. अध्यक्षांसह सहा पदाधिकारी व नऊ सदस्य अशा १५ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत अॅड. राजेंद्र लालासाहेब चव्हाण पॅनेल, अॅड. व्ही. आर. पाटील पॅनेल व अॅड. गिरीश के. नाईक पॅनेल अशा तीन पॅनेलसह तीन अपक्ष असे एकूण ४८ जण रिंगणात होते. (प्रतिनिधी) विजयी उमेदवार, मते व कंसात पॅनेलचे नाव : अॅड. राजेंद्र एल. चव्हाण - ७०३ (अॅड. राजेंद्र लालासाहेब चव्हाण पॅनेल ) अध्यक्ष, अॅड. प्रशांत वाय. चिटणीस - ६६६ (अॅड. गिरीश के. नाईक पॅनेल) उपाध्यक्ष, अॅड. रवींद्र जानकर - ४९९ (अॅड. व्ही. आर. पाटील पॅनेल) सेक्रेटरी , अॅड. सुनील कृष्णात रणदिवे - ४९९ (अॅड. गिरीश के. नाईक पॅनेल) लोकल आॅडिटर, अॅड. धनश्री आकाराम चव्हाण, ६३१. (राजेंद्र चव्हाण पॅनेल) महिला प्रतिनिधी, कार्यकारिणी सदस्य असे : अॅड. सुशीला पांडुरंग कदम - ५४१ (अॅड. गिरीश के. नाईक पॅनेल) महिला प्रतिनिधी, अॅड. विजयकुमार व्ही. ताटे-देशमुख - ७५८ (राजेंद्र चव्हाण पॅनेल ), ८) अॅड. मिलिंद मुकुंद जोशी - ५५७ (राजेंद्र चव्हाण पॅनेल), अॅड. विवेक पांडुरंग जाधव - ५३२ , अॅड. रवींद्र अशोक नाईक - ५१६ , अॅड. सुस्मित जयेंद्र कामत - ४९५ , १२) अॅड. सचिन पी. मेंडके - ४९५, अॅड. विठोबा शिवाजी जाधव - ४७३, अॅड. बाबासो आनंदराव वागरे - ४७२ (सर्व अॅड. राजेंद्र चव्हाण पॅनेल) (प्रतिनिधी)
अध्यक्षपदी राजेंद्र चव्हाण
By admin | Published: May 03, 2015 1:13 AM