जयसिंगपूर : सहकाररत्न स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या पत्नी व सार्वजनिक आरोग्य, कुटुंबकल्याण, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मातोश्री श्रीमती सावित्री शामराव पाटील-यड्रावकर यांचे आज (मंगळवारी) सकाळी ६.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या.
गेल्या दीड महिन्यापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. लाॅकडाऊन आणि संचारबंदीमुळे निवडक लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडला.शिरोळ तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, शरद सहकारी साखर कारखान्यास विविध संस्थांचे संस्थापक स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांच्या त्या पत्नी होत. शामराव पाटील यांच्या राजकीय जीवनात त्यांनी मोलाची साथ दिली. त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष स्वरूपा पाटील, माजी उप नगराध्यक्ष संजय पाटील -यड्रावकर, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या मागे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर अशी दोन मुले, पाच मुली, जावई, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
स्वर्गीय सावित्री अक्कांना श्रद्धांजली व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे, याची जाणीव आहे. परंतु करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीची जाणीव ठेवून कार्यकर्त्यांनी अंत्यविधीमध्ये सहभागी होण्यासाठी येऊ नये. निवडक दहा-पंधरा नातेवाइकांसह अंत्यविधी करीत आहोत. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या अटीचे पालन करण्याची जबाबदारी असल्याने अंत्यदर्शन सर्वांसाठी फेसबुक लाईव्हद्वारे उपलब्ध करून देत आहोत, असे पाटील परिवाराने कळवले होते.
यड्रावकर कुंटुबातील सदस्य आणि निवडक नातेवाईकांसह उदगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज मंगळवारी सकाळी नऊ वाजता सावित्री यड्रावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रांताधिकारी विकास खरात व तहसीलदार डॉक्टर डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ अंत्यविधीसाठी उपस्थित होते.