संदीप बावचेशिरोळ : शिरोळच्या राजकीय साठमारीत राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळविला. प्रचाराचे नेटके नियोजन आणि दगाफटका होऊ नये म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत घेतलेली खबरदारी यशस्वी ठरली. महाविकास आघाडीकडून गणपतराव पाटील व स्वाभिमानीकडून लढणारे उल्हास पाटील यांची गणिते चुकली. हा निकाल स्वाभिमानी पक्षाला आत्मचिंतन करायला लावणारा ठरला. जातीपातीच्या राजकारणापेक्षा जनता विकासालाच मत देते हे यड्रावकर यांच्या विजयातून अधोरेखित झाले आहे. विधानसभेचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमटणार आहेत.तालुक्याची निवडणूक यापुढे जातीपातीवर न होता विकासकामांवर होईल, अशी भूमिका घेऊन यड्रावकर निवडणुकीत उतरले होते. पाच वर्षांतील विकासकामांचा मुद्दा, मतांचे ध्रुवीकरण होऊ नये यासाठी त्यांनी टाकलेले डावपेच यशस्वी ठरले. यड्रावकर यांच्या बाजूने गुरुदत्तचे अध्यक्ष माधवराव घाटगे, स्वाभिमानीचे सावकर मादनाईक यांच्यासह घटक पक्षातील नेत्यांचे योगदान मोलाचे ठरले. यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील-यड्रावकर यांच्या नियोजनामुळे ते किंगमेकर ठरले आहेत.
गणपतराव पाटील युवा मतदारांना खेचण्यात अयशस्वी ठरले. दुसऱ्या फळीतील नेत्यांचा फारसा प्रभाव देखील दिसून आला नाही. तर, स्वाभिमानीतून उल्हास पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाली. याचवेळी स्वाभिमानीचे सावकार मादनाईक यांनी महायुतीला पाठिंबा देत शेट्टी यांना धक्का दिला. त्यामुळे स्वाभिमानीची वोट बँक घटली आणि याचा फायदा आपसुकच यड्रावकरांना झाला.निवडणुकीत स्व. सा.रे. पाटील यांचे राजकीय वारसदार कोण हा मुद्दा प्रभावीपणे गाजला. यड्रावकर यांनी विजयश्री खेचून आणत तेच राजकीय वारसदार असल्याचे सिध्द करुन दाखविले. लोकसभेनंतर विधानसभेचा निकाल शेट्टी यांना डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. लाडकी बहीण योजनेबरोबरच तरुणाई, शेतकरी, दलित, मुस्लिम यासह ओबीसी समाजातील घटक महायुतीसह महाविकास आघाडीच्या बाजूने राहिल्याचे दिसून आले. मात्र, अखेरच्या टप्प्यात यड्रावकर यांनी महायुतीच्या काळातील विकासकामांचा लेखाजोखा मतदारांपर्यंत पोहोचविला आणि तो मतदारांना भावला.
गावागावांत यड्रावकरांना लीडलक्षवेधी ठरलेल्या जयसिंगपुरात यड्रावकर यांना २२,८८१ तर, गणपतराव यांना १०,७६२ मते मिळाली. तालुक्यातील ५५ गावांपैकी शिरोळ, धरणगुत्ती, जांभळी, कुटवाड, कनवाड, गौरवाड, औरवाड, बुबनाळ, बस्तवाड, आलास, नवे दानवाड, राजापूरवाडी या बारा गावांत किरकोळ लीड गणपतराव पाटील यांना तर, ४३ गावांत यड्रावकर यांनाच लीड मिळाल्याचे दिसून आले. स्वाभिमानीच्या हक्काच्या गावामध्येही यड्रावकरच भारी ठरले आहेत.
आगामी निवडणुका लक्षवेधी ठरणार..शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीला पुन्हा ताकद दाखवावी लागणार आहे. तर, विरोधी काँग्रेससह स्वाभिमानी, उद्धव सेना, शरद पवार गट यांची भूमिका काय असणार यावरच आगामी राजकारणाची गणिते अवलंबून असणार आहेत.