कोल्हापूर : मतदारसंघात जावई वारंवार त्रास देत असून त्याला आवर घालण्याची मागणी सासऱ्यांकडे करूनही त्यात फरक न पडल्याने त्याचा थेट परिणाम आमदार असणाऱ्या सासऱ्याला भोगावा लागल्याचा प्रत्यय कोल्हापुरातील शिवसेनेच्या (शिंदे गट) महाअधिवेशनात पाहायाला मिळाला.त्याचे झाले असे : शिवसेनेचे सांगोला (जि. सोलापूर) मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे जावई रविकिरण इंगवले हे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे विरोधक आहेत. शिवसेनेच्या महाअधिवेशनाची पूर्ण जबाबदारी क्षीरसागर यांच्याकडे आहे. त्यांनी अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराजवळच मोठा फ्लेक्स उभा करत त्यावर शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार यांचे फोटो लावले आहेत. मात्र, यात शहाजीबापू पाटील यांचा फोटो नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. 'काय झाडी काय डोंगर' या डायलॉगमुळे शहाजीबापू राज्यभर प्रसिद्ध आहेत. मात्र, क्षीरसागर यांनी स्वागतपर फ्लेक्स उभा करताना आ.पाटील यांना मुद्दामहून वगळल्याची चर्चा आहे. रविकिरण इंगवले हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आहेत. शिवाय शहराचे माजी उपमहापौरही राहिले आहेत. शिवसेना एकत्र असताना इंगवले व क्षीरसागर यांच्यामध्ये कमालीचा दोस्ताना होता. मात्र, शिवसेनेच्या फुटीनंतर दोघांनीही वेगवेगळे राजकीय पर्याय निवडल्याने त्यांच्यात बिनसले.गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये या ना त्या कारणाने वाद, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. इंगवले यांच्याकडून होणारा त्रास क्षीरसागर यांनी आ. पाटील यांच्या कानावर घातला आहे. मात्र, सासऱ्याने सांगूनही हा त्रास थांबत नसल्याने क्षीरसागार यांनी आ. पाटील यांना फ्लेक्सवरुन वगळत जावयावरचा राग थेट सासऱ्यावर काढला की काय, अशी चर्चा सुरू आहे.
जावयाचा त्रास आवरा; फलकावरून गायब झाला सासरा, कोल्हापुरात रंगले राजकीय युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 12:13 PM