कोल्हापूर : शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी पुकारलेल्या बंडामध्ये कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर सामील झाले होते. यासर्व राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन करत बहुमत देखील सिद्ध केले आहे.मात्र, कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अन् राजेश क्षीरसागर यांच्यात टोकाचे राजकीय वाद होते. पण राज्यात आता शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्याने राजेश क्षीरसागर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरेंबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.क्षीरसागर म्हणाले, ‘मातोश्री हे आमचं मंदिर आहे. आमचा देव (उद्धव ठाकरे) मंदिरात होता, तेच योग्य होतं, त्याला बाहेर काढलं गेलंय,’ अशा शब्दांत राजेश क्षीरसागर यांनी उद्वव ठाकरेंबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. तर, दर १० ते १५ वर्षांनी शिवसेनेमध्ये अशी परिस्थिती येते, ती कशामुळे येते याचा विचार व्हावा असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.क्षीरसागर पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटील हे माझे जुने सहकारी आहेत. मधल्या २०१४ ते १९ दरम्यान काही मतभेद झाले होते, त्यामुळं आज मी मन मोकळं करायला त्यांना भेटलो. एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र आहेत. शिवसेना आणि भाजप वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे सांगितले.
आमच्या देवाला मंदिरातून बाहेर काढलं गेलं : राजेश क्षीरसागर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 4:39 PM