कोल्हापूर : राजेश क्षीरसागर हा बेगडी धर्मवीर आहे. मला आणि काँग्रेेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांनी प्रेमाने जेवायला बोलावले, त्याचे पैसे मात्र सतेज पाटील यांच्याकडून घेतल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी येथे केला. आमदार प्रकाश आबीटकर आणि क्षीरसागर हे शिवसेना सोडूनच गेल्याने त्यांची वेगळी हकालपट्टी कशाला, अशी विचारणा त्यांनी केली.केशवराव भोसले नाट्यगृहात शुक्रवारी झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. राऊत म्हणाले, क्षीरसागर यांना शिवसेनेने भरभरून दिले. तरीही ते शिवसेना सोडून गेले. क्षीरसागर यांनी स्वत:च धर्मवीर ही पदवी लावून घेतली. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतच त्यांच्या स्वार्थी राजकारणाची वळवळ जाणवली. सगळी पदे आपल्याला आणि कुटुंबातील सदस्यांना मिळावीत, अशी त्यांची भावना होती. भाजपचे चंद्रकांत पाटील यांचाही ते शेलक्या शब्दांत उद्धार करीत होते. आता चंद्रकांतदादाच माझे नेते आहेत, असे सांगत आहेत.जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, शिवसेनेतून बाहेर गेलेले क्षीरसागर यांना पक्षाने आमदारकी, कॅबिनेट दर्जाचे पद दिले. तरीही ते पक्ष सोडून गेले. त्यांना जयप्रभासह इतर स्वत:चे प्रश्न साेडवून घ्यायचे आहेत. त्यांना विकासकामांशी काहीही देणे-घेणे नाही.जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, शिवसेनेतून बाहेर पडलेले सर्व जण हिंदुत्वासाठी नव्हे, तर पैशासाठी बाहेर गेले आहेत. प्रत्येकास ५० कोटी दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे आगामी काळात गद्दारांना जनता धडा शिकवेल.
'राजेश क्षीरसागर यांनी जेवायला बोलावले अन् पैसे सतेज पाटलांकडून घेतले'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 1:24 PM