लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सिध्दांत हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात आम्ही नैतिकतेने काम करत असतानाही, हेतूपुरस्सररित्या सूडबुध्दीने बदनामी करण्याचा तसेच नाहक त्रास देण्याचा प्रयत्न राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर करत आहेत. यापुढे त्यांनी असाच प्रयत्न केला, तर त्यांच्याविरोधात पाच कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशारा डॉ. कौस्तुभ वाईकर व डॉ. अनुष्का वाईकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
डॉ. वाईकर म्हणाले, मी एक महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा नोंदणीकृत न्यूरोसर्जन आहे. माझ्याकडे न्यूरोसर्जनसाठी लागणारी सर्व कागदपत्रे व शैक्षणिक अर्हता आहे. ती पाहून क्षीरसागर यांनी खात्री करून घ्यावी. शैक्षणिक अर्हतेचा मुद्दा परत काढला, तर मला अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल. तशी कायदेशीर नोटीस त्यांना लवकरच देण्यात येईल.
क्षीरसागर यांनी स्वत: कोरोना सेंटर सुरू करावे व डॉक्टरांची टीम तयार करावी. स्वत:चा जीव धोक्यात घालून आमदार लंके यांच्यासारखी जनसेवा करावी व मगच कोल्हापूरच्या जनतेला तोंड दाखवावे, स्वार्थी राजकारण करू नये, असा सल्लाही डॉ. वाईकर यांनी यावेळी दिला.
डॉ. अनुष्का वाईकर या सीपीआर रुग्णालयात बारा वर्षांपासून उत्कृष्ट सेवा देत होत्या. कोविडमध्येही त्यांनी चांगले काम केले, असे असताना राजेश क्षीरसागर यांनी सतत त्रास देऊन राजीनामा देण्यास भाग पाडले, असा आरोप करत शाहूंच्या नगरीत अशाप्रकारे महिलांना वागणूक देणे हे लोकनेत्याला लांच्छनास्पद आहे, असे वाईकर यांनी सांगितले.