कोल्हापूर : तेलंगणा राज्यातील जगन्नाथ पंडित या शाहजहान राजाच्या दरबारातील राजकवीचा जीवनपट सर्वांसमोर यावा आणि त्यांचे कार्य कसे राष्ट्रीय होते, याची माहिती सर्वांना मिळावी, या उद्देशाने त्यांच्या जीवनावरील नाटक लिहिल्याची माहिती कन्नड आणि संस्कृत भाषांतील धारवाड येथील प्रतिभावंत लेखक डॉ. चंद्रमौळी एस. नाय्कर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मूळ कन्नड नाटकाच्या संस्कृति-संगम या मराठीत अनुवाद केलेल्या नाट्यसंहितेचा प्रकाशन समारंभ उद्या, रविवारी करवीर नगर वाचन मंदिर येथे दुपारी ४.३० वाजता होणार आहे.डॉ. नाय्कर यांनी ४० वर्षांत कन्नड आणि संस्कृत या भाषांत ५० दुर्मीळ पुस्तकांचे लिखाण केले आहे. कन्नड नाटक आणि मालिकांमध्ये त्यांनी अभिनयही केला आहे. दहाहून अधिक आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधनिबंध वाचले आहेत.
हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि वैश्विक समताभाव यांवर आधारित ऐतिहासिक विषयावरील त्यांनी लिहिलेल्या संस्कृति-संगम या डॉ. अ. रा. यार्दी यांनी लिहिलेल्या मराठी नाटकाचा प्रकाशन समारंभ कोल्हापुरात होत आहे. ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. संजय ठिगळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.सन १५९० ते १६६५ असा कालखंड असलेल्या जगन्नाथ पंडितराज यांनीच ताज महाल हे नाव दिले. हिंदू असूनही ते शाहजहानच्या दरबारात राजकवी होते. ‘अलंकारसम्राट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंडितराज यांच्या वलयामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात ‘पंडितराय’ हे पद निर्माण केले. त्यांच्यावर पद्मनाभ सोमय्या यांनी १९७० मध्ये कादंबरी लिहिली आहे.
ज्येष्ठ लेखक विद्याधर गोखले यांनीही त्यांच्यावर नाटक लिहिले आहे. याशिवाय एस. एन. कित्तूर यांनी १९७३ मध्ये लिहिलेले नभोनाट्य धारवाड आकाशवाणीवर, तर १९७८ मध्ये हैदराबाद आकाशवाणीवर त्याचा उर्दू अनुवाद प्रसारित झाला आहे, अशी माहिती डॉ. नाय्कर यांनी दिली. या पत्रकार परिषदेस अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूरचे प्रकाशक प्रा. वसंत खोत, प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर आणि सहजसेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे उपस्थित होते.