कोल्हापूर : सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावरील कोल्हापुरातील काका फॅन्स क्लबच्या चाहत्यांचे प्रेम पाहून अभिनेत्री डिंपल कापडिया भारावून गेल्या. हृदयस्पर्श हौशी सांस्कृतिक व्यासपीठामार्फत राजेश खन्ना यांच्या स्मृतिदिनानिमित्त १८ जुलैला होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी दोन्ही मुलींसह उपस्थित राहण्याचे आश्वासनही त्यांनी ‘हृदयस्पर्श’चे पद्माकर कापसे यांना दिले. अभिनेत्री डिंपल कापडिया या एका कार्यक्रमासाठी कोल्हापुरात येऊन गेल्या. यावेळी काका फॅन्स क्लबच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत ‘हृदयस्पर्श’मार्फत दरवर्षी राजेश खन्ना यांच्याविषयी होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी ‘हृदयस्पर्श’च्या संचालकांनी प्रतीवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाचे अल्बम तसेच सीडी डिंपल यांना दाखविले. ते पाहून डिंपल यांनी महाराष्ट्रात राजेश खन्ना यांचे अनेक चाहते आहेत; परंतु त्यांचा स्मृतीदिन केवळ कोल्हापुरात होत असल्याचे सांगून कोल्हापुरातील कार्यक्रमाला येण्याचे आश्वासन दिले. यावेळी ‘पहिला सुपरस्टार : राजेश खन्ना’ या पुस्तकाचे अनावरणही डिंपल यांनी केले. ‘हृदयस्पर्श’चे पद्माकर कापसे, डॉ. सतीश पत्की, विवेक सोळंकी, डी. वाय. पाटील परिवाराचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील, आदींनी डिंपल यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. इन्शाह अल्लाह अगली बार जरूर मिलेंगे’ हृदयस्पर्शतर्फे दरवर्षी १८ जुलैला राजेश खन्ना यांच्या स्मृतीदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाचे निमंत्रण पद्माकर कापसे यांनी डिंपल यांना दिले. यावेळी डिंपल यांनी ‘इन्शाह अल्लाह अगली बार जरूर मिलेंगे’ असे आश्वासन देत कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले. हृदयस्पर्श हौशी सांस्कृतिक व्यासपीठामार्फत राजेश खन्ना यांच्या कार्यक्रमाचा अल्बम अभिनेत्री डिंपल कापडिया यांनी पाहिला. यावेळी डॉ. संजय डी. पाटील, विवेक सोळंकी, पद्माकर कापसे, डॉ. सतीश पत्की उपस्थित होते.
राजेश खन्ना यांच्या चाहत्यांमुळे डिंपल भारावल्या...
By admin | Published: March 10, 2016 12:56 AM