कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाचा आपल्या सोईसाठी वापर करून घेतला आहे. हा वापर पुढे होऊ नये, याकरिता नव्याने स्थापन होणाऱ्या मराठा समाजाच्या पक्षाला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. हा निर्णय राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात झालेल्या मेळाव्यात एकमताने घेण्यात आला. अध्यक्षस्थानी भुयेवाडीच्या माजी सरपंच राणीताई पाटील होत्या.नव्याने स्थापन होत असलेल्या मराठा समाजाच्या पक्षाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी शिवाजी मंदिरात आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी तीनशेहून अधिक महिलांनी जिल्हाभरातून उपस्थिती लावली होती. राज्यातील सर्वच पक्षांनी केवळ मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला आहे. त्यातून समाजाला मागास ठेवण्याचे काम या सर्वच पक्षांनी केले आहे. त्यामुळे नव्याने मराठा समाजाचा पक्ष निर्माण होत आहे. त्यास जाहीर पाठिंबा व्यक्त करण्याचा ठराव पाटील यांनी मांडला. त्यास ब्रिगेडच्या सर्वच महिला पदाधिकारी, सदस्यांनी हात उंचावून जाहीर पाठिंबा व्यक्त केला.जिल्हाध्यक्षा सुनीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्षा सुधा सरनाईक यांनी आभार, तर रूपाली मोरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सुवर्णा मिठारी, लता जगताप, शीतल कुराडे, सरिता सासने, स्मिता हराळे, दीपाली लोंढे, छाया जाधव, रेश्मा पोवार, पूजा पाटील, अनिता जाधव, स्नेहल कुराडे, रूपाली कुराडे, साक्षी अतिग्रे, सारिका मांगले, शारदा आगळे, माई वाडेकर, अमृता पाटील, सीमा भोसले, आदी उपस्थित होत्या.