लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारूढ आघाडीचे राधानगरीचे उमेदवार राजू पांडुरंग भाटळे हे सर्वसाधारण गटात सर्वाधिक मतांनी पराभूत झाल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. विरोधी आघाडीचे तीन उमेदवार पराभूत झाले. परंतु, हे तिन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी विरोधी आघाडीस अजून ८३ ते ११८ मते कमी पडली आहेत.
संघाच्या राजकारणात गेली पाच वर्षे बचाव समितीच्या माध्यमातून लढणारे नेते म्हणून विजय मोरे यांची ओळख होती. परंतु, त्यांना विरोधी आघाडीतून संधी मिळाली नाही. राधानगरी तालुक्याच्या राजकारणात मोरे घराण्याला वेगळी ओळख आहे. त्यामुळे त्यांना पॅनेलमध्ये संधी देण्यासाठी सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार पी. एन. पाटील हे पॅनेल जाहीर होण्याच्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत आग्रही होते. परंतु, महाडिक गटाने भाटळे यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. त्यामुळे अखेर त्यांनाच उमेदवारी मिळाली. परंतु, ते सर्वाधिक मतांनी पराभूत झाल्याने त्यांची निवड चुकल्याचेच स्पष्ट झाले आहे.
सर्वसाधारण गटात विरोधी आघाडीचे तीन उमेदवार १८ ते २३ मतांनी पराभूत झाले; पण विरोधी आघाडीचे सर्व म्हणजे १६ उमेदवार निवडून येण्यासाठी अजून ८३ ते ११८ मते आवश्यक होती. सत्तारूढचे अंबरीश घाटगे हे १८०३ मते घेऊन बाराव्या क्रमांकावर आहेत. म्हणजे विरोधी आघाडीचे बाकी ५ उमेदवारांना किमान १८०४ मते मिळाली असती तर ते सर्वजण विजयी झाले असते. याचा अर्थ विरोधी आघाडीला सर्वसाधारण गटातील पूर्ण १६ जागा मिळण्यासाठी एस. आर. पाटील यांना ८३, प्रकाश पाटील-९५, विद्याधर गुरबे- ११३, वीरेंद्र मंडलिक व महाबळेश्वर चौगुले यांना प्रत्येकी ११८ मते मिळायला हवी होती. सर्वसाधारण गटात सर्वांत जास्त मते घेणारे अरुण डोंगळे १९८० मते मिळवून २८९ मतांनी विजयी झाले. सोळा नंबरचे उमेदवार प्रकाश पाटील हे सर्वांत कमी म्हणजे १८ मतांनी विजयी झाले. त्यांना १७०९ मते मिळाली.
पराभूतमधील सत्तारूढ गटाचे नेते व संघाचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे हे सर्वांत कमी ७७ मतांनी पराभूत झाले. विद्यमान ज्येष्ठ संचालक रणजित पाटील मुरगूडकर, धैर्यशील देसाई यांना नामुष्कीजनक पराभवास सामोरे जावे लागले. मुरगूडकर पाटील स्वत:च्या तालुक्यातच सर्व गटाकडून टार्गेट झाल्याचे दिसत आहे.
सतेज पाटील यांचे टार्गेट
पालकमंत्री सतेज पाटील यांनी फुटीर मतदान होणार हे आधीच लक्षात घेऊन २२८० मतांवर लक्ष केंद्रित केले होते. किमान ४०० मते जरी फुटीर झाली तरी विरोधी आघाडी विजयी होऊ शकते असे नियोजन त्यांनी केले होते. त्याला यश आल्याचे दिसत आहे.
सत्तारूढचे उमेदवार किती मतांनी पराभूत यावर नजर..
रवींद्र आपटे : ७७
उदयसिंह पाटील सडोलीकर : ७८
रणजित पाटील मुरगूडकर : ११२
रणजित बाजीराव पाटील-साबळेवाडी : १५१
दीपक भरमू पाटील : १७९
प्रताप पाटील कावणेकर : १८२
रविश पाटील कौलवकर : २१४
धनाजी देसाई : २२७
सत्यजित सुरेश पाटील : २३३
सदानंद राजकुमार हत्तरकी : २४१
धैर्यशील बजरंग देसाई : २४३
प्रकाश चव्हाण : २४३
राजू भाटळे : २४६