कोल्हापूर : ‘‘राजू चळवळीचं बरं चाललंय नव्हं, सरोज यांना जेवल्याशिवाय जाऊ देऊ नको’’, हे बोल आहेत अंथरुणावर खिळलेल्या एन. डी. पाटील सरांचे... हे प्रेमाचे आपुलकीचे बोल ऐकून राजू शेट्टींनाही भरून आले. जवळपास अर्धा तास त्यांच्यासमवेत बसून ते जड अंतकरणाने माघारी फिरले. त्यांना बऱ्यापैकी विस्मरण होते, पण या घटनेच्या निमित्ताने चळवळीविषयी आत्मीयता आणि घरी आलेल्याविषयींची अगत्यशीलता याचे पुन्हा एकदा दर्शन घडले.
एन. डी. पाटील हे चळवळीतील भीष्माचार्य. त्यांच्यासोबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी खांद्याला खांदा लावून चळवळीत सहभागी झाले. त्यामुळे चळवळीतील या दोन्ही नेत्यांचे वेगळेच ऋणानुबंध जुळलेले. एन. डी. पाटील आजारी आहेत, अंथरुणाला खिळून आहेत, म्हटल्यावर त्यांनी रुईकर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यासोबत भगवान काटे, स्वस्तिक पाटीलही होते.
एन. डी. पाटील हे गेल्या वर्षभरापासून आजारी आहेत. अलीकडे पाच-सहा महिन्यांत तर त्यांची प्रकृती जरा जास्तच खालावली आहे. त्यांना भेटण्यास मज्जाव केला तरी चळवळीतील नेते मंडळी अधूनमधून आवर्जून त्यांची भेट घेतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, मागच्या आठवणींना उजाळा देतात. तसे वयोमानपरत्वे त्यांना आता विस्मरण होत आहे, समोर आलेली व्यक्ती पटकन आठवत नाही, पण थोडा वेळ गेला की ते घडाघडा बोलायला लागतात. सगळे मागचे पुढचे संदर्भ त्यांना आठवतात.
धिप्पाड शरीरयष्टी आणि बोलण्यातील करारीपणा असे पाहण्याची सवय झालेल्यांना एन. डी. सरांची आताची परिस्थिती डोळ्याने बघवत नाही, मनाने सहन होत नाही. तरीदेखील त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चार शब्द तरी बोलावे म्हणून धडपडत त्यांची घरी धाव घेतली जाते. माजी खासदार राजू शेट्टी यांनीदेखील अशीच बुधवारी त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली, त्यांची ख्याली खुशाली माईंकडून जाणून घेतली. राजू शेट्टी आले आहेत, असे म्हटल्यावर एन. डी. यांना थोडा वेळ काही आठवले नाही. पण आपला चळवळीतला राजू आला आहे म्हटल्यावर त्यांनी लगेच प्रतिसाद देत राजू चळवळीचे कसे चालले आहे, सगळे बरे आहेत नव्हे अशी ख्याली खुशाली विचारत सक्रिय राहा, असा सल्लाच दिला.
फोटो: २५०६२०२१-कोल-राजू शेट्टी
फोटो ओळ : माजी खासदार राजू शेट्टी व भगवान काटे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांची त्यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.