विश्वास पाटील
कोल्हापूर : हुपरी (ता.हातकणंगले ) येथे जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून राजेंद्र भीमराव नेर्लेकर यांनी निमित्तसागर महाराजांच्या श्रावकाकडून घेतलेले ४० लाख रुपये परत दिल्याने या प्रश्नी निर्माण झालेल्या वादावर शनिवारी पडदा पडला. निमित्तसागर महाराज, महावीर गाट, जैन समाजाचे प्रतिनिधी व राजेंद्र नेर्लेकर आदींची बैठक होऊन हा तोडगा काढण्यात आल्याची माहिती स्वत: निमित्तसागर महाराज व राजेंद्र नेर्लेकर यांनी दिली. यावेळी महावीर गाट, अजित पाटील, अमोल गाट आदी उपस्थित होते. हा निर्णय दोन्हीकडून मान्य करण्यात, तसेच रकमेबाबत काही समज-गैरसमज निर्माण झाले होते ते आता दूर झाल्याने आपले आंदोलन थांबवत असल्याचे निमित्तसागर महाराजांनी यावेळी सांगितले.
विविध प्रकारचे उद्योग उभारणी करून व विविध करन्सीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून राजेंद्र नेर्लेकर यांनी आपल्या श्रावकांना कोट्यवधी रुपयांना फसविले आहे, असा आरोप करीत निमित्तसागर महाराजांनी नेर्लेकर याच्या दारातच १८ डिसेंबरला उपोषण सुरू केले होते. श्रावकांची ही रक्कम परत न मिळाल्यास आपण पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा इशाराही महाराजांनी दिला होता. दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन महाराजांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला; पण महाराज आपल्या निर्णयावर ठाम राहिले. याप्रश्नी नेर्लेकर यांच्या घरातच बंद दाराआड गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरू होती. २० डिसेंबरला उपोषण स्थगित करताना चर्चेत काय ठरले याची माहिती नंतर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यासाठी शनिवारी पत्रकार परिषद झाली.
विश्वासाला तडा..
हुपरीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या चांदीचे व्यवहार हे कोणत्याही प्रकारची लिखापढी न करता एकमेकांवरील विश्वासावर होत असतात. त्या विश्वासाला तुम्ही तडा देण्याचे काम करीत आहात. हे आता थांबवा असा सज्जड दम महावीर गाट यांनी नेर्लेकर याला यावेळी दिला. राजू नेर्लेकर म्हणाला, आतापर्यंत माझ्या हातून ज्या काय चुका झाल्या आहेत त्याबद्दल मला अद्दल घडली असल्याने यापुढे असा प्रकार माझ्या हातून घडणार नाही.३५० कोटी, २३ कोटी ते ४० लाख
उपोषण सुरू करताना नेर्लेकर यांच्याकडून तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती स्वत: निमित्तसागर महाराज यांनीच दिली होती. नंतरच्या बैठकीत बँकेच्या माध्यमातून झालेले व्यवहार २३ कोटी रुपयांचे असल्याचे सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात तोडगा ४० लाखांवरच मिटला. त्यामुळे नक्की किती रकमेची फसवणूक झाली याबद्दलचा संभ्रम कायम राहिला. आपण तपस्वी आहात, साडेतीनशे कोटींचा व्यवहार झाल्याचे आपणच सांगितले होते आणि आता ४० लाखांवर तोडगा यातून काय अर्थ काढायचा, अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर महाराज गप्पच राहिले. इतरांनी मग समज-गैरसमजातून हे आकडे सांगितले गेल्याची सारवासारव केली.