कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांना कोल्हापूरच्या मतदारांनी २०१४ ला धडा शिकविल्याने ते २०१९ च्या महापुराच्या मोर्चात सहभागी होते. त्यानंतर आम्ही २०२१ ला पूरग्रस्तांच्या मदतीसह वीज दरवाढीबाबत मोर्चे काढले, त्यामध्ये मंत्री पाटील यांनी दिलेल्या आश्वसनातील काय पाळले? आता त्यांच्या तोंडाला कुलूप का? असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
शेती पंपांसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, पूरग्रस्तांना गुंठ्याला ९५० रुपये देतो म्हणून सांगणाऱ्या मंत्र्यांची तोंडे आता बंद का आहेत? शेतकऱ्यांचे घर-दार, जमिनी जाऊन धरणे उभारली. त्या धरणातील पाण्यावर वीज तयार करता, मग त्यावर आमचा हक्क नाही का? वीज निर्मितीसाठी २१ पैसे युनिटला खर्च येतो आणि तीच वीज सहा रुपयांनी विकली जाते.
स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी जसे तुम्हाला खुर्चीवर बसविले आहे, तसे ते खालीही खेचू शकतात. महावितरणने शेतकऱ्यांना लुटले असून, पन्नास वर्षांत एकही खांब बदलला नाही. मात्र, महिन्याला स्थिर आकार घेतला जातो. तेरा गुंठ्यांना १७ हजार वीज बिल शेतकऱ्याला आले, त्याने करायचे काय? आगामी काळात एकोप्याने पुढे जाण्याची गरज आहे. पक्षाचे झेंडे फेका आणि शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानीच्या झेंड्याखाली या.
राजेंद्र गड्यान्नावर म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने राजकारण करतो म्हणणारे शरद पवार यांनी कुटील राजकारण केल्यानेच आतापर्यंत त्यांना ५० पेक्षा अधिक आमदार निवडून आणता आले नाहीत. एका पराभवाने राजू शेट्टी यांनी खचून न जाता शेतकऱ्यांसाठी पुन्हा ताकदीने लढाई करायची आहे. यावेळी भरत बँकेचे अध्यक्ष भरत मोरे, जयकुमार कोल्हे, सागर कोंडेकर, अजित पोवार, जनार्दन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
‘एन. डी’ चे ओझे वाहणारे ‘लमाण’ व्हा
ज्येष्ठ दिवंगत नेते एन. डी. पाटील यांच्या जाण्याने चळवळीत पोकळी तयार झाली असून, त्यांचे विचार व चळवळीचे ओझे वाहणारे ‘लमाण’ राजू शेट्टी यांनी व्हावे, असे आवाहन प्रा. पाटील यांनी केले.
रस्ताही कंटाळला असेल
गेली वीस वर्षे दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो मोर्चे काढले, मात्र प्रश्न सुटले नाहीत. आता हा रस्ताही कंटाळला असेल, मात्र राज्यकर्त्यांना चांगली बुद्धी सुचत नसल्याची टीका शेट्टी यांनी केली.
‘आसूड’, झेंडे अन् घोषणाबाजी
मोर्चातील शेतकऱ्यांच्या हातातील ‘स्वाभिमानी’च्या झेंड्यांनी परिसर फुलून गेला होता. अधूनमधून ‘आसुडा’चा आवाज व घोषणांनी परिसर दणाणून जात होता.
५० हजारांची नुसती चर्चा... म्हणून मोर्चा.
‘तिन्ही पक्षांचे सरकार, मुंबईत त्यांचे विद्यालय, बारामतीत त्यांचे मुख्याध्यापक आणि किराणाच्या दुकानांत त्यांची मद्यालये’ तर ‘५० हजारांची नुसतीच चर्चा... म्हणून स्वाभिमानी’चा धडक मोर्चा’ या घोषणांना शेतकऱ्यांनी टाळ्यांची दाद दिली.