विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात यावेळेला नवाच भिडू मैदानात उतरणार आहे. गेल्या तिन्हीवेळेला त्यांच्याविरोधात नवीन उमेदवार रिंगणात उतरला आहे. यावेळेला शिवसेनेकडून संभाव्य उमेदवार म्हणून धैर्यशील माने यांचे नाव निश्चित मानले जाते. भाजपकडूनही ही जागा आपल्याला मिळावी, असे प्रयत्न सुरू होते; परंतु शिवसेनेने या जागेवरील हक्क सोडला नसल्याने माने यांना संधी मिळू शकते. देशाच्या राजकारणात खासदार शेट्टी गेली तीन वर्षे सातत्याने मोदींच्या विरोधी बोलत आहेत; त्यामुळे त्यांच्या पराभवासाठी भाजप या मतदारसंघात ताकद पणाला लावणार, असेच चित्र आहे. शेट्टी विजयाची हॅट्ट्रिक करतात का, याकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष आहे.ही जागा आपल्याकडे घेऊन तेथून शेट्टी यांच्याविरोधात ताकदीचा उमेदवार द्यायचा असा भाजपचा प्रयत्न होता. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याही नावाची मध्यंतरी चाचपणी झाली होती. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत हे तर वारंवार मीच लढणार असे स्वत:च जाहीर करीत होते; परंतु शिवसेनेबरोबर युती झाल्यावर त्यांच्या कलाने घेणे भाजपला भाग पडले. त्यामुळे या पक्षाने या जागेसाठी फारसे ताणवून धरलेले नाही. सदाभाऊ रिंगणात उतरले असते तर ‘शेट्टी विरुद्ध खोत’ लढत रंगतदार झाली असती व खरेच शेतकरी कुणाला पाठबळदेतात याचाही फैसला झाला असता. मोदी यांना घरात बसविण्याची भाषा सर्वांत पहिल्यांदा शेट्टी यांनी सुरू केली.महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकरी संघटनांची मोट बांधून मोदी सरकारविरोधात रान उठविण्याचे काम त्यांनी केले. भाजपविरोधात काँग्रेस पक्ष जेवढ्या त्वेषाने रस्त्यांवर उतरला नाही, तेवढ्या त्वेषाने शेट्टी रस्त्यांवर उतरले. मोदी सरकार हे शेतकरीविरोधी आहे, हे शेतकऱ्यांच्या मनांवर बिंबविण्यात ते यशस्वी झाले आहेत, याचा राग भाजपला आहे. त्यामुळे या निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव हे भाजपचे राज्यस्तरीय लक्ष्य आहे. या मतदारसंघातील कोणतेही मोठी संस्था, एकही आमदार त्यांच्या पाठीशी नाही. या मतदारसंघात १४ साखर कारखाने आहेत; परंतु त्यांच्याशी संघर्ष करून शेट्टी यांनी यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून देण्यात यश मिळविले आहे. गेल्या निवडणुकीत ते महाआघाडीचे महत्त्वाचे घटक होते. या निवडणुकीत ते काँग्रेस आघाडीचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची राजकीय ताकद त्यांच्यामागे असेल. ‘ज्या शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही कायमच शिव्या दिल्या, त्यांच्या मांडीला मांडी लावून आता तुम्ही कसे बसणार?’ अशी विचारणा त्यांना होणार आहे. शेट्टी यांनी जेव्हा भाजपला सोडचिठ्ठी दिली तेव्हाच ‘लोकमत’ने आगामी निवडणुकीत आमदार जयंत पाटील व प्रकाश आवाडे हेच शेट्टी यांचे प्रचारप्रमुख असतील, असे म्हटले होते. आता घडामोडीही त्याच वळणावर आहेत. मागच्या निवडणुकीत शेट्टी यांची जात काढण्याचा प्रयत्न झाला; परंतुत्यातून त्यांचे मताधिक्य वाढल्याने तो मुद्दा काहीसा मागे पडल्याचे दिसत आहे.शिवसेनेने धैर्यशील माने यांच्यासारख्या नव्या दमाच्या तरुणास मैदानात उतरण्याचे ठरविले आहे. या मतदारसंघात युतीचे तब्बल पाच आमदार आहेत. हा मूळ मतदारसंघ काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांचा आहे. धैर्यशील हे त्यांचे नातू आणि माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळेत्यांची बांधीलकी आपल्याला कामी येईल या विचाराने त्यांनी शड्डू ठोकला आहे.गेल्या निवडणुकीत राजू शेट्टी व कल्लाप्पाण्णा आवाडे यांना विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मतेमतदार संघ राजू शेट्टी कल्लाप्पाण्णा आवाडेशाहूवाडी १०६१९३ ६३२९३हातकणंगले १२७०५० ७८९१८इचलकरंजी ९७६९१ ७७८७९शिरोळ ११११२६ ८७५७३इस्लामपूर ९५३९२ ७१९४७शिराळा १०१७३९ ८२३०५एकूण मते ६४०४२८ ४६२६१८
राजू शेट्टी विरुद्ध भाजप असाच सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:32 AM