कोल्हापूर : धर्मांध शक्तींचा पराभव केला पाहिजे, अशी भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) घेतली आहे. त्या भूमिकेशी सहमत असलेल्या खासदार राजू शेट्टी यांना आम्ही या निवडणुकीत साथ देत आहोत. हातकणंगले मतदारसंघातील पक्षाचे सर्व कार्यकर्ते खासदार शेट्टी यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत, अशी माहिती ‘भाकप’चे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी गुरुवारी दिली.
येथील बिंदू चौकातील पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे म्हणाले, देशातील सध्याच्या निवडणुका या धर्मांध शक्ती विरुद्ध धर्मनिरपेक्ष शक्ती आणि हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध लोकशाहीवादी कार्यकर्ते अशा आहेत. या निवडणुकीत कामगार कष्टकरी अल्पसंख्याक दलित महिला अशा सर्वांनी विचारपूर्वक मतदान करण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांत या सर्व दुर्बल घटकांवरील हल्ले वाढले आहेत. त्याचा विचार करून ‘भाकप’ने धर्मांध शक्तींचा पराभव केला पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेशी खासदार शेट्टी हे सहमत आहेत.
सध्या पक्षात नसलेले आनंदा गुरव यांची भूमिका वादग्रस्त आहे; पण ते सध्या पक्षात नसल्यामुळे त्यांच्या भूमिकेशी पक्षाचा दुरान्वयानेही संबंध नाही. कष्टकरी जनतेने खासदार शेट्टी यांना विजयी करावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात येत आहे. या बैठकीस पक्षाचे शहर सचिव रघुनाथ कांबळे, जिल्हा सहसचिव गिरीश फोंडे, अनिल चव्हाण, भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा प्रा. सुनीता अमृतसागर, सचिव स्नेहल कांबळे, सुमन पाटील, हनुमंता लोहार, मीना चव्हाण, रमेश वडणगेकर, दिलदार मुजावर उपस्थित होते.