मुंबई - कोल्हापूर जिल्ह्यातील कबनूर ता. हातकंणगले येथील कबनूर हायस्कूलची विद्यार्थीनी श्रुती सुधीर कांबळे हिने खेलो इंडिया स्पर्धेत उंच उडी मध्ये देशात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळविले. श्रुती कांबळे हिचे वडील इचलकरंजी येथे हातमागावर कामगार म्हणून कार्यरत आहेत. श्रुतीने घरच्या परिस्थीवर मात करत अभूतपुर्व यश संपादन केले. श्रुतीच्या या यशाबद्दल हातकणंगलेचे माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी अभिनंदन केले आहे.
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रुती कांबळेने 17 वर्षाखालील गटात उंच उडीत सुवर्णवेध घेतला. या स्पर्धेतील पदार्पणातच नेत्रदीपक कामगिरी केली. श्रुतीने दुस-या प्रयत्नात 1.64 मीटर्सपर्यंत उडी मारली. तिने नुकत्याच पंजाबमध्ये झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तर फेडरेशन चषक स्पर्धेत तिला ब्राँझपदक मिळाल होते. 17 वर्षीय खेळाडू श्रुती ही इचलकरंजी येथे सुभाष माने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ती कबनूर कनिष्ठ महाविद्यालयात 11 वी वाणिज्य शाखेत शिकत आहे. येथील विजेतेपदाबाबत तिला आत्मविश्वास होता. त्याविषयी ती म्हणाली, शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील विजेतेपदामुळे माझे मनोधैर्य उंचावले होते. या स्पर्धेतील बरेचसे स्पर्धक खेलो इंडिया स्पर्धेत असल्यामुळे माझ्यासाठी सोपे आव्हान होते. तरीही मी येथील स्पर्धेसाठी चांगली तयारी केली होती. आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळविण्याचे माझे ध्येय आहे.
श्रुतीच्या या यशानंतर तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी श्रुतीच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे एका कामगाराच्या मुलीने, चक्क पत्र्याच्या घरात राहतानाही आपलं उंच ध्येय मनी बाळगल, याच विशेष कौतुकं केलं. राजू शेट्टींच्या अभिनंदनामुळे श्रुती व तिच्या कुटुंबीयांनाही मोठा आनंद झाला आहे.