कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी हे धर्मनिरपेक्ष आघाडीसोबत यावेत, असा आमचा प्रयत्न होता. मात्र, त्यांचा वेगळा पवित्रा दिसत आहे. त्यांनी आमचा पाठींबा घेतला नाहीतर ‘हातकणंगले’त उमेदवार द्यावा लागेल, तशी चाचपणी शिवसेनेकडून सुरु असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले.जयंत पाटील म्हणाले, ‘हातकणंगले’त राजू शेट्टी आमच्या वतीने लढावेत, अशी महाविकास आघाडीची इच्छा होती. शिवसेना नेत्यांशी त्यांची चर्चा सुरु असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. मात्र, यात सकारात्मक चर्चा दिसत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने तिथे उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.सांगलीत शिवसेनेने उमेदवार घोषित केल्याने काहीसा पेच निर्माण झाला असून यामध्ये आणखी काही मार्ग निघतो का? यासाठी प्रयत्न सुरु आहे. ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत बोलणे सुरू आहे, दोन दिवसात अपेक्षित निर्णय होईल. असेही त्यांनी सांगितले. ‘सातारा’तून खासदार उदयनराजे भोसले आमच्या संपर्कात नसल्याचेही त्यांनी सांगितले.
माढ्यात दुसरा उमेदवार तयारमाढ्याची जागा ‘रासप’चे नेते महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला होता. त्यांनी सहमती दर्शवली पण, ऐन वेळी ते महायुतीसोबत गेले. येथे दुसरा उमेदवार तयार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
‘कोल्हापूर’, ‘सातारा’तच पराभव मग ४५ प्लस कसे?भाजपच्या ४५ प्लस घोषणाची खिल्ली उडवताना जयंत पाटील म्हणाले, महायुतीचा ‘कोल्हापूर’ व ‘सातारा’ येथे पराभव निश्चित आहे. यापेक्षा वेगळे वातावरण महाराष्ट्रात नाही.
धनगर समाज भाजपवर नाराजभाजपने धनगर समाजाची सातत्याने फसवणूक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हा समाज त्यांच्यावर नाराज असून लोकसभा निवडणूकीत ते दिसेल, असे पाटील यांनी सांगितले.