कोल्हापूर : जर या देशात पेट्रोल शंभर रुपयांनी विकत असेल, तर दूध का नको? असा सवाल करत, गोकुळ ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था असून त्यावर शेतकरी प्रतिनिधीच संचालक म्हणून पाठविण्यासाठी आपण आग्रही राहू, असा आग्रह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी धरला आहे. शेतकरी, वीज ग्राहकांसह इतर प्रश्नांवर स्वाभिमानीच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरू केले जाणार आहे, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. दुधाला शंभर रुपये लिटरची मागणी होणे, यात चुकीचे काय आहे? असे शेट्टी यांनी विचारले.
गोकुळच्या निवडणुकीसंदर्भातील चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोण-कोणासोबत जाणार, कोणा-कोणाची आघाडी होणार हे लवकरच समजेल. स्वाभिमानी गोकुळच्या निवडणुकीत असणार आहे, दूध संघावर शेतकऱ्यांचा प्रतिनिधी पाठविण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. यावरच आम्ही ठाम राहणार आहे.
निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी, अद्याप आम्हाला चर्चेसाठी कोणाचेही निमंत्रण आलेले नाही. कोणाचेही निमंत्रण आले तरी शेतकरी प्रतिनिधी ही आमची भूमिका काय राहील, असेही राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितले.