खोची : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या मुलाची लगीनघाई सुरू असताना कार्यकर्त्यांच्या मुलाच्या लग्नात जाऊन शुभाशीर्वाद देत भोजनाचा आस्वाद घेतला. साहेब, तुम्ही लग्नात येऊन जेवल्याशिवाय मी जेवणार नाही असा हट्ट धरला होता. तो हक्काचा हट्ट पुरवीत नेत्याचं कार्यकर्त्यांवर असलेली प्रेमजिव्हाळा दाखवून दिला. त्यामुळे लग्नास उपस्थित असलेले सर्वच अवाक झाले. नेत्याची कार्यकर्त्यांवर किती अपार श्रद्धा असू शकते हे पाहून उपस्थितांना अभिमान वाटला.काल रविवारी राजू शेट्टी यांचे चिरंजीव सौरभ यांचा विवाह बाहुबली येथे १२.५१ मिनिटांनी संपन्न झाला, तर त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते संघटनेचे जिल्हा सरचिटणीस खोची येथील शिवाजी पाटील यांचा मुलगा विनय याचा विवाह वडगाव येथे इरा हॉलमध्ये त्याच वेळेस झाला.शेट्टी यांच्या मुलाचा लग्नसोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत झाला, तर संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते शिवाजी पाटील यांच्या मुलाच्या लग्नास हजर होते. परंतु पाटील यांच्या लग्न कार्यक्रमात शेट्टी साहेब नसल्याची उणीव जाणवत होती. अनेक मान्यवर आले होते. तरीसुद्धा साहेब येणार आहेत की नाही याची विचारणा करीत होते. साहेब आल्याशिवाय मी जेवणार नाही असे शिवाजी पाटील म्हणत होते.मुलाच्या लग्नाच्या अक्षता टाकून पै पाहुणे यांना गडबडीत भेटून अखेर शेट्टी हे गाडीत बसले. त्यांची गाडी थेट वडगावच्या दिशेने निघाली. ती पाटील यांच्या मुलाच्या लग्नाच्या हॉलमध्ये दाखल झाली. स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा कार्यक्रम असतानासुद्धा शेट्टीसाहेब माझ्या मुलाच्या लग्नात आले. माझ्या निष्ठेचं फळ मला मिळाले असा आनंद त्यांनी व्यक्त केला.
स्वत:च्या मुलाचे लग्न सोडून, कार्यकर्त्यांच्या मुलाच्या लग्नास उपस्थिती; राजू शेट्टींचा प्रेमजिव्हाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 6:04 PM