संदीप बावचे
जयसिंगपूर : ऊस दराची कोंडी फुटल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांची ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आले. जयसिंगपूर, शिरोळ येथे स्वागत झाल्यानंतर शेट्टी यांनी आई रत्नाबाई यांची निवासस्थानी भेट घेवून आशिर्वाद घेतले. शेतकऱ्यांना न्याय देवूनच तु घरी आलास, अशा भावना आई रत्नाबाई यांनी यावेळी व्यक्त केल्या.ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी १७ ऑक्टोंबरपासून आक्रोश यात्रा सुरु केली होती. शेट्टींनी आंदोलनाची सुरुवात आईचा आशिर्वाद घेवूनच केली. आई रत्नाबाई कृत्रिम श्वासोच्छावासावर असलेने पदयात्रा काढायची की नाही, या विवंचनेत शेट्टी होते. पण तू पदयात्रा सुरु कर, शेतकऱ्यांना न्याय देवूनच घरी परत ये, असे बळ शेट्टी यांना दिल्यानंतर पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. पदयात्रेनंतर ऊस परिषदेदिवशीच शेट्टी यांनी जागेवरच ठिय्या आंदोलन सुरु केले होते.दरम्यान, ऊस दरप्रश्नी गुरुवारी रात्री उशिरा तोडगा निघाला. ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आल्यानंतर राजू शेट्टी रात्री उशिरा घरी आले. आई रत्नाबाई या गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आजारी आहेत. यावेळी आई रत्नाबाई यांनी त्यांना टिळा लावून शेट्टी यांना आशिर्वाद दिला.