कोल्हापूर : सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मगावी गहुली (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथून वसंतराव नाईक कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात केली असून ते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात जाऊ लागली आहे. वाढलेली महागाई, नैसर्गिक आपत्ती, खतांचे वाढलेले दर, सरकारचे शेतीमालाच्या चुकीचे आयात- निर्यात धोरण, रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशके, शेती औजारे याच्या माध्यमातून जी. एस. टी.चा शेतकऱ्यांवर पडलेला बोजा, यामुळे कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतीतून लोक बाहेर पडू लागले आहेत. यामुळे सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, ही मागणी ते करत आहेत.
यावेळी स्वाभिमानीचे डॅा. प्रकाश पोपळे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले, वसंतराव नाईक यांचे नातू ययाती नाईक, स्वाभिमानीचे विदर्भ प्रवक्ता मनीष जाधव, हणमंत राजुगोरे, परभणी जिल्हा अध्यक्ष किशोर ढगे, गहुलीचे सरपंच नितीन कोल्हे, उपसरपंच विलास आडे आदी उपस्थित होते.कर्जमुक्तीचे अर्ज राष्ट्रपतींना देणारशेतक-यांच्याकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घेऊन ते अर्ज राष्ट्रपतींना देणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या जाणार आहेत.‘वंचित’च्या शिष्टमंडळाने घेतली भेटआगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने तिसऱ्या आघाडीसाठी चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहभागी व्हावे, यासाठी ‘वंचित’च्या शिष्टमंडळाने सोमवारी राजू शेट्टी यांची भेट घेतली. पण, कर्जमुक्तीचे आंदोलन झाल्याशिवाय विधानसभा निवडणूकीबाबत विचार करणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.