कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे; पण, याबाबत आघाडीकडून अद्याप निरोपच आलेला नाही. आज, शनिवारी याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, अशी भूमिका आघाडीतील प्रमुखांची पहिल्यापासून आहे. मात्र, शिवसेना सोडून दोन्ही काँग्रेसला सोबत घेण्यास शेट्टी यांचा विरोध होता. त्यामुळे आघाडीत पेच निर्माण झाला आहे. आघाडीकडून उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर शेट्टी यांनी आघाडीचा पाठिंबा घेण्यास अनुमती दिली. मात्र, आता आघाडीकडूनच निरोप आलेला नाही. आघाडीकडून येथून उमेदवार देण्यासाठी आघाडीतील बडा नेता प्रयत्न असल्याने निर्णयाला विलंब होत असल्याची चर्चा आहे.दरम्यान, शेट्टींना ‘हातकणंगले’त पाठिंबा दिल्याच्या बदल्यात राज्यात इतर ठिकाणी आघाडीच्या उमेदवारांना पाठबळ देण्याची भूमिका घेतली जाणार आहे. त्यामुळे आज पाठिंब्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
‘स्वाभिमानी’चा प्रभाव‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेचा हातकणंगले वगळता सात लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे. ‘कोल्हापूर’, ‘सांगली’, ‘बारामती’, ‘परभणी’, ‘बुलढाणा’, ‘माढा’, ‘सातारा’ येथे संघटनेची ताकद आहे. बुलढाण्यातून संघटनेचे रविकांत तुपकर हे रिंगणात उतरणार हे निश्चित असल्याने उर्वरित ठिकाणी आघाडीला ताकद मिळू शकते.