कोल्हापूर : महायुतीचा मेळावा झाला आणि गाड्या सुसाट जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या दालनात संजय मंडलिक यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह नेते उपस्थित राहिले. हातकणंगलेचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्ममंत्री शिंदे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या दालनात आले.या गाड्या सोडताना पोलिसांनी अडवाअडवी केल्याने चक्क मंत्री हसन मुश्रीफ यांचीच गाडी बाहेर राहिली. त्यामुळे मुश्रीफ यांनी गाडी जवळ दिसत नसल्याने विनय कोरे यांच्या गाडीत बैठक मारली. एवढ्यात कोरे माने यांचा अर्ज भरून आले. ते आपल्या गाडीत मागे बसले. मुश्रीफ शिंदेसमवेत जाणार असल्याने आणि कोरे पुढे निघणार असल्याने मग मुश्रीफ उतरले आणि मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या गाडीत बसू लागले. परंतू त्यांना पहिल्या सीटवर बसता येईना. मग रामदास कदम पुढे बसले आणि मुश्रीफ मागे बसले.
मुश्रीफ, कोरे गाडीत बसले असताना दुसरीकडून राजू शेट्टी अर्ज दाखल करण्यासाठी आले. त्यांनी जाताना मुश्रीफ आणि कोरे यांच्या हातात हात दिला आणि ते अर्ज भरण्यासाठी पुढे गेले. तर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत असल्याने मंडलिक हे एक, दोघांच्या खांद्यावर हात टाकत बाजुच्या फुलझाडांच्या कुंड्यामधून वाट काढत खाली आले.
प्यायला पाणी, पण ग्लासच नाहीतजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पिण्याचे पाणी ठेवले आहे. परंतू तेथे ग्लासच ठेवले नसल्याने बाटलीत पाणी भरून पाणी प्यावे लागत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी थंड पेय ठेवा असे आवाहन केले होते. पण पेले नसल्याने अनेकांची कुचंबणा झाली.
वडापाववर मारला ताव..महायुतीच्या कार्यकर्त्यासाठी यावेळी वडा-पाव आणि पाणी बाटल्यांची सोय करण्यात आली होती. ऊन प्रचंड असल्याने अनेकांनी दोन, चार बाटल्या सोबत घेतल्या होत्या. तर गाडीत नेण्यासाठी काहींनी पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्सच उचलून नेले. महायुतीचा मेळावा झाल्यावर कार्यकर्ते सावलीला बसून वडा-पाव खातानाचे चित्र सगळीकडे दिसत होते.