खोची : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुकीसाठी सात जागांची मागणी केली आहे. त्यातील किमान तीन जागा मिळाल्यास आघाडीत सामील होणार आहे. नांदेड येथे होणाऱ्या महाआघाडीच्या मेळाव्यासाठीे निमंत्रणही मिळाले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली. खोची (ता. हातकणंगले) येथे रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनासाठी खासदार राजू शेट्टी आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी लोकसभा निवडणूक व साखर दर याबाबत सविस्तर चर्चा केली.खासदार शेट्टी म्हणाले, ‘संपूर्ण कर्जमाफी व दीडपट हमीभाव ही मागणी मान्य झाली असून, लोकसभेसाठी सात जागांची मागणी केली आहे. त्यापैकी हातकणंगले, बुलढाणा, वर्धा या किमान जागा मिळल्यास समाधानी आहे. तसे झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी महाघाडीत सहभागी होणार आहे तशी चर्चा सुरू आहे. त्यानुसार लवकरच या महाआघाडीत सहभागी झाल्याचा निर्णय होईल.स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बुलढाण्यातून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, वर्धा येथून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मला स्वत:ला उमेदवारी दिली जाणार आहे. या तीन जागांसाठी आमचा आग्रह आहे. महाघाडीत सामील झाल्यानंतर सहभागाचे सविस्तर कारण सांगितले जाईल. वास्तविक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आघाडीत सहभागी होण्याची चर्चा सुरू आहे. तीन खासदार निवडून आल्यास शेतकºयांसाठी अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येईल, असे खासदार शेट्टी म्हणाले. साखर कारखानदारांना उसाला एफआरपीप्रमाणे रक्कम द्यावीच लागेल. सध्याच्या स्थितीत त्यापेक्षा जादा दर मिळणे कठीण आहे, असे चित्र आहे.नरेंद्र मोदी पलटलेमोदी सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी आहे. सत्तेत नसताना म्हणजे विरोधी पक्षात होते तेव्हा जसे बोलत होते, तसे सत्तेत आल्यावर ते बोलत नाही. त्याचा तोटा त्यांना आगामी काळात होणार आहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
तीन जागा मिळाल्यास आघाडीत जाणार :राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:21 AM