कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभेला सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. ‘ईव्हीएम’बाबत जनतेमध्ये कमालीचा संभ्रम असून, याविरोधात जनआंदोलन उभे करण्याबाबतही या भेटीत चर्चा झाली आहे.कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, स्वाभिमानी पक्ष, रिपाइं (कवाडे व गवई गट), शेकाप, समाजवादी पार्टी आदी पक्ष एकत्रित येऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले; पण राज्यात आघाडीला सपाटून मार खावा लागला. या निवडणुकीनंतर मुंबईत मंगळवारी आघाडीतील प्रमुखांची बैठक झाली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी दुपारी ‘कृष्णकुंज’वर जाऊन ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी विधानसभेला वंचित बहुजन आघाडी, ‘मनसे’ यांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याबाबत दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. महाआघाडीत सहभागी होण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेऊ, असे ठाकरे यांनी शेट्टी यांना सांगितले.‘ईव्हीएम’बाबतही या भेटीत चर्चा झाली. वायफायच्या माध्यमातून मशीनमध्ये फेरफार कसा करतो येतो, यासह अनेक प्रकारची माहिती आपल्याकडे असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले. याविरोधात जनआंदोलन उभे करण्याबाबत ठाकरे व शेट्टी यांचे एकमत झाले आहे.
राजू शेट्टी यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 5:13 AM