लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : ‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ येथे भेट घेतली. सत्तारूढ आघाडीला पाठिंबा देण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून यामध्ये शेट्टी यांनी पाठिंब्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज, बुधवारी कोल्हापुरात केली जाणार आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली विरोधी आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे राजू शेट्टी हेही त्यांच्यासोबत राहतील, असे वाटत होते. मात्र, पॅनल बांधणीसह इतर घडामोडींमध्ये त्यांचा फारसा संपर्क राहिला नाही, उलट शेट्टी यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याचवेळी शेट्टी यांची ‘गोकुळ’ निवडणुकीतील भूमिकेची दिशा स्पष्ट झाली होती. या पार्श्वभूमीवर धनंजय महाडिक यांनी शेट्टी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान मल्टीस्टेटचा रद्द केलेला ठराव, कोरोना काळात दूध उत्पादकांना झालेली मदत आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर सत्तारूढ गटाला पाठिंब्याबाबत शेट्टी यांनी अनुकूलता दर्शविल्याचे समजते. आज, कोल्हापुरात आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर घोषणा केली जाणार आहे.
बैठकीला सावकार मादनाईक, प्रा. जालिंदर पाटील, सागर शंभूशेटे, बंडू पाटील, डॉ. महावीर अकोळे, स्वस्तिक पाटील, आदिनाथ हेमगिरे, मिलिंद साखरपे, शैलेश आडके, नगरसेवक शीतल गतारे, बजरंग खामकर आदी उपस्थित होते.
कोट...
सत्ताधारी आघाडीला पाठिंबा द्या, अशी विनंती धनंजय महाडिक यांनी आपल्याला भेटून केली आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आपण त्यांना सांगितले आहे.
- राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)