इचलकरंजी : भाऊ-बहिणीमधील प्रेम व स्नेह वृद्धिंगत करणारा रक्षाबंधन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना संसर्गामुळे सणावर काही प्रमाणात निर्बंध येत असले तरी रक्षाबंधनाने भाऊ-बहिणीचे नाते घट्ट बांधण्यात आले. रविवारी सुटीच्या दिवशी रक्षाबंधन असल्याने जणू दुग्धशर्करा योग आला होता. त्यामुळे भाऊरायांनी आवर्जुन रक्षाबंधनासाठी हजेरी लावली. शहरवासीयांनी कोरोनाचे सर्व नियम पाळूनच रक्षाबंधन उत्साहात साजरा केला.
मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे संकट असल्याने अनेक कुटुंबांमध्ये भाऊ बहिणींना एकमेकांकडे जाता आले नाही. यामुळे त्यांनी घरच्या घरीच किंवा ऑनलाइन पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला. मात्र, यंदा शहरात कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रणात आली आहे. त्याचप्रमाणे सरकारने निर्बंधांमध्येदेखील काही प्रमाणात शिथिलता दिली असल्याने भाऊ-बहीण एकमेकांकडे जाऊन कोरोनाचे सर्व नियम पाळूनच रक्षाबंधन उत्साहात साजरा केला.
रविवारीही दुपारपर्यंत बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दिसत होती. पारंपरिक राख्यांसोबतच मल्टिकलर लेसेस, कार्टून्स, डायमंड वर्क, फॅन्सी, मोती, स्टोन अशा विविध प्रकारच्या राख्या दोन रुपयांपासून चारशे रुपयांपर्यंत मिळत होत्या. खरेदी करताना नाजूक व फॅन्सी राखीला प्राधान्य देण्यात येत होते. आपल्या लाडक्या बहिणीला रक्षाबंधनचे गिफ्ट घेण्यासाठी गिफ्ट शॉपीमध्येही बाजारात गर्दी दिसत होती. रक्षाबंधन भेट कार्ड, ज्वेलरी, पर्स, साडी, टॉप, फोटोफ्रेम, अशा गिफ्टला चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.