चला लेझीम शिकूया उपक्रम : शिवगर्जना तरुण मंडळातर्फे आयोजनकोल्हापूर : महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा असलेल्या पारंपरिक लेझीम खेळाची आजच्या तरुणाईला ओळख व्हावी यासाठी कोल्हापुरात ‘चला लेझीम शिकूया’ उपक्रमांतर्गत मोफत लेझीम प्रशिक्षण सोमवार(दि. २४)पासून सुरू झाले.उन्हाळी सुटीनिमित्त शिवगर्जना तरुण मंडळ आणि कै. शामराव शिंदे फौंडेशन यांच्यातर्फे शनिवार पेठेतील खोलखंडोबा सांस्कृतिक हॉल आवारात हे लेझीम प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २५ मे २०१७ पर्यंत लेझीम प्रशिक्षण सुरू राहणार आहे.आजच्या तरुणाईला डॉल्बीचे फार वेड लागले आहे. त्यामुळे आजच्या तरुणाईला लेझीम खेळाचा विसर पडला आहे. त्याची ओळख व्हावी व त्यांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी मोफत लेझीम प्रशिक्षण या मंडळाने सुरू केले. या प्रशिक्षणात पाच वर्षापासून ते १५ वर्षापर्यंतच्या मुला-मुलींचा विशेषत: समावेश आहे. रोज सायंकाळी पाच ते सात या वेळेत हे लेझीम प्रशिक्षण नंदवाळचे प्रशिक्षक अतुल कुंभार देणार आहेत. सध्या ६० मुला-मुलींचा प्रशिक्षणात समावेश आहे. दरम्यान, ‘चला लेझीम शिकूया’चे शेतकरी सहकारी संघाच्या संचालिका सुमित्रा शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. यावेळी कमर्शियल बँकेचे संचालक अॅड. प्रशांत शिंदे, नगरसेवक किरण शिराळे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, नितीन मुधाळे, शुभम आंबेकर आदी उपस्थित होेते.
पारंपरिक लेझीममध्ये रमले बालगोपाल !
By admin | Published: April 26, 2017 12:45 AM