कोल्हापूर : शासनाने कृषी पंपांना ४४ पैशांची एकतर्फी दरवाढ केली आहे. या अन्यायी वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १८ आॅगस्टला सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केले. डॉ. पाटील म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून वीज दरवाढीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. मध्यंतरी वीज नियामक आयोगाकडे हरकती दाखल करून बाजूही मांडली. विधानसभेत कृषिपंपांची वीज दरवाढ करणार नसल्याचे ऊर्जामंत्री यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र ७२ पैसे प्रतियुनिट असलेला कृषी पंपाचा वीजदर १ रुपये १६ पैसे केली आहे. तब्बल ४४ पैशांची अन्यायी वीज दरवाढ लादली आहे. ही दरवाढ मुकाटपणे सहन केल्यास पुन्हा भविष्यात शेतकऱ्यांवर वीज दरवाढीचे मोठे संकट येण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या केलेल्या दरवाढीला आमचा कडाडून विरोध आहे. दरवाढीमुळे शेतकरी आर्थिक संकटात येणार आहे. शेतमालाला उत्पादन खर्चावर दर मिळत नसल्याने बळिराजा अडचणीत आहे. उसाचे बिल सात, आठ महिन्यांनंतरही मिळालेली नाहीत. पावसाची वक्रदृष्टी आहे. उभी पिके वाळत आहेत. राज्यात दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दिलासा देण्याऐवजी वीज दरवाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. राज्यातील सर्व कृषी पंपांचे वीजदर शेजारील सर्वच राज्यांपेक्षा दुप्पट, दीडपट आहेत. शेतकऱ्यांनी कर्जबाजारी करणारी दरवाढ आहे. त्यामुळे शासनाने नोव्हेंबर २०१४ मधील सवलतीचे वीजदर किमान दोन वर्षे स्थिर ठेवावेत. विधानसभा निवडणुकीतील आश्वासन पाळावे. कृषी पंपांना केवळ ८ ते ९ तासच वीज मिळते. परिणामी शेतकरी हैराण झाला आहे. यामुळे त्वरित वीज दरवाढ मागे घ्यावी. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. १८) दसरा चौकातील श्री छत्रपती शाहू शिक्षण संस्था (शाहू मराठा बोर्डिंग) येथे मेळावा होणार आहे. दुपारी १ वाजता मेळाव्याला सुरुवात होईल. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सहकारी पाणीपुरवठा संस्था प्रतिनिधी, शेतकरी यांनी उपस्थित राहावे. यावेळी बाबासाहेब पाटील-भुयेकर, आर. जी. तांबे, चंद्रकांत पाटील, सखाराम चव्हाण, आर. के. पाटील, विक्रांत पाटील-किणीकर, एस. ए. कुलकर्णी, मारुती पाटील उपस्थित होते. किरकोळ विषय... जिल्ह्यातील आमदार, खासदारांना शेतीपंप वीज दरवाढीचा विषय किरकोळ वाटत असतो. त्यामुळे वीज दरवाढीच्या विरोधातील आंदोलनात ते सहभागी होत नाहीत, असा टोला डॉ. पाटील यांनी लगावला.
वीजदरवाढीविरुद्ध मेळावा
By admin | Published: August 11, 2015 1:09 AM