कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी ६ एप्रिलला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानासमोर भव्य मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. महालोकन्यायालयाचे ११ एप्रिलचे कामकाज बंद पाडण्याचा निर्णय मंगळवारी कराड येथे झालेल्या खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत घेतल्याची माहिती समितीचे निमंत्रक विवेक घाटगे यांनी दिली. कराड तालुका बार असोसिएशनच्या कार्यालयात सहा जिल्ह्यातील खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्किट बेंच स्थापनेसाठी पत्र उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा व राज्यपालांना दिल्याचे सांगितल्यामुळे फेब्रुवारीमधील आंदोलन स्थगित केले होते. परंतु हे पत्र अद्याप कोणालाच पोहोचले नसल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कराडमध्ये बैठक झाली. सहा महिन्यांपासून पालकमंत्री पाटील यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृती समितीची फसवणूक केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्किट बेंचच्या मागणीसाठी राज्य मंत्रिमंडळ ठराव करेपर्यंत जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थानासमोर मोर्चा काढून धरणे आंदोलन करणार आहे. मुंबई येथे लाँग मार्चने जाऊन लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सभेमध्ये सर्वांनी मंजुरी दिली. सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष अजय डांगे, महेश जाधव, बाळासाहेब पानसकर, राजेंद्र मंडलिक, शिवाजीराव राणे, एफ. एम. झारी, के. व्ही. पाटील, दीपक पाटील, बाळासाहेब पाटील, राजेंद्र किंकर, नरेंद्र गांधी, प्रशांत चिटणीस, प्रकाश मोरे, व्ही. आर. पाटील, आदींसह सहा जिल्ह्यांतील वकील उपस्थित होते. कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. २६) कृती समितीला बैठकीसाठी निमंत्रित केले आहे.
पालकमंत्र्यांच्या घरावर ६ एप्रिलला मोर्चा
By admin | Published: March 25, 2015 12:22 AM