कोल्हापूर : तुमचे मत तुमचा अधिकार, एक मत एक मूल्य, मतदार असल्याचा अभिमान बाळगा, अशा विविध घोषणांनी शुक्रवारी शहरातील मार्ग दुमदुमले. मतदार जनजागृतीपर रॅलीत सहभागी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींसह ‘एनसीसी’ व ‘एनएसएस’च्या छात्रांनी मतदानाविषयी जनजागृती केली.रॅलीची सुरुवात बिंदू चौक येथे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भरतनाट्यम् नृत्यांगना संयोगिता पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, महापालिका उपायुक्त मंगेश शिंदे, करवीरचे प्रातांधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन गिरी उपस्थित होते. सुरुवातीस मतदार जनजागृतीपर पथनाटय सादर करण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृतीसाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींची रॅली बिंदू चौक-शिवाजी पुतळा-महानगरपालिका-दसरा चौक या मार्गावरून परत शाहू स्मारक भवन येथे आली. मतदार जनजागृती रॅलीतून मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, अशा घोषणा शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींसह एन.सी. सी. आणि एनएसएसच्या छात्रांनी दिल्या.